|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संगीतातील नावलौकिकासाठी घराणेबाज गायकी शिकावी

संगीतातील नावलौकिकासाठी घराणेबाज गायकी शिकावी 

प्रतिनिधी/ पणजी

संगीतातून पीएचडी पर्यंत शिक्षण घेऊन नोकरीही मिळवता येते. विद्यार्थ्यांनी म्युझिक कॉलेजमधून जरुर शिक्षण घ्यावे त्याचबरोबर एखाद्या गुरुकडून गंडा बांधून घराणेबाज गायकी शिकून घ्यावी तरच त्याचे नाव लौकिक वाढेल, असे उद्गार संगीतविदूशी अल्कादेव मारुलकर यांनी काढले. कला आणि संस्कृती खात्याने आयोजित केलेल्या युवा प्रतिभोत्सव या युवा आणि नवोदितांसाठी आयोजित केलेल्या संगीत संमेलनात ते बोलत होते.

कला अकादमीच्या कृष्ण कक्षात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय युवा संगीत संमेलनाचा प्रारंभ विदूशी अल्कादेव मारुलकर यांच्या शिष्या मालपे – पेडणे येथील स्वराली पणशीकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग देवगिरी बिलावल सादर करुन रसिकांची मने जिंकली. जयपूर घराण्याच्या गायकीचा छाप त्यांनी दाखविला. गान हिरा पारितोषिक प्राप्त झालेल्या स्वराली पणशीकर यांनी एम.ए पर्यंतचे शिक्षण संगीतातच घेतले आहे व सध्या तिचा पीएचडीचा अभ्यास सुरु आहे.

कला व संस्कृती खात्याने आयोजित केलेल्या या संमेलनात गुरु व शिष्य यांचा एकत्रित संवाद घडवण्याचा चांगला उपक्रम राबवला. त्यात विदूशी अल्कादेव मारुलकर प्रश्नांना उत्तर देत नवोदितांना मार्गदर्शन करत होत्या.

गायन शिक्षण घेताना गुरु समोर बसून आपण माईक लावून ध्वनीक्षेपावर गात नाही पण जेव्हा जेव्हा कला सादर करावी लागते तेव्हा तेव्हा माईक वापरावाच लागतो व सर्व ठिकाणी एक सारखी ध्वनीक्षेपक व्यवस्था असत नाही. त्यामुळे माईकच्या व्हेरिएशनप्रमाणे गाण्याची कलाही विद्यार्थ्यांनी शिकून घ्यावी. संगीताचे किती गहरे ज्ञान आत्मसात केले हे कोणी बघणार नाही तर सादरीकरण कसे झाले हे पाहूनच रसिक दर्जा ठरवतात, असे अल्कादेव मारुलकर यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले.

व्यावसायिक गाय व्हा, बाजारी नको

गाणे सादर करताना आपण व्यावसायिक की बाजारी कलाकार आहोत ते पाहावे. बाजारी कलाकाराला भरपूर पैसे मिळतात. पैशासाठीच त्याचे कार्यक्रम ठरलेले असतात तर व्यावसायिक कलाकारासमोर जरी एकच प्रेक्षक असला तरी तो तेवढय़ाच गोडीने आणि उत्कंठेने गाणे सादर करणार असे त्या म्हणाल्या. व्यावसायिक गायक जरुर व्हा पण बाजारी गायकी तयार करु नका, असे त्या म्हणाल्या.

या व्यावसायिक संगीताच्या गायनाचा ध्यास घेतलेल्या नवोदितांना कला अकादमी, कला व संस्कृती खात्याने तसेच वेगवेगळी संगीत संमेलने आयोजित करणाऱया आयोजकांनी दत्तक घ्यावे आणि गोव्याबाहेर कार्यक्रमात त्यांना सहभागी होण्यास मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. त्यांच्या शिष्या शिल्पा हुबळे परब यांनी या वार्तालाप कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. या युवा प्रतिभोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री प्रसाद सावकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी पं. विभव नागशेकर, पं. विजय बक्षी, डॉ. अल्कादेव मारुलकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, विदूशी श्रृती सडोलीकर काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. अरवींद थत्ते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले तर आभार संचालक प्रसाद लोलयेकर यांनी मानले. दिवसभरात विविध कलाकारांनी आपली कला सादर केली. त्यात मुंबई येथील यशवंत वैष्णव यांचे तबला वादन गोव्यातील चारुदत्त गावस यांचे हार्मोनियम वादन व नंतर त्यांचे गुरु पं. सुभाष फातर्पेकर यांच्याशी वार्तालाप झाला. दुपारच्या सत्रात प्राची जठार यांच्या गायनाचा कार्यक्रम व नंतर गुरु पं. विजय बक्षी यांच्याशी चर्चा झाली. संध्याकाळी मुंबई येथील बासरी वादक एस. आकाश यांचे बासरीवादन झाले.

रविवारच्या पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी 9.30 वा. बासरीवादक सोनिक वेलिंगकर यांच्या बासरीवादनाने होणार आहे तर त्यांचे गुरु पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी वार्तालाप होणार आहे.

दिवसभराच्या सत्रात सिद्धेश डिचोलकर हार्मोनियम व त्यांचे गुरु पं. तुळशिदास बोरकर यांच्याशी चर्चा, महेश वझे यांचे तबलावादन व त्यांचे गुरु उल्हास वेलिंगकर यांच्याशी चर्चा होणार आहे. संध्याकाळी सचिन तेली यांचे गायन व त्यांचे गुरु डॉ. शशांक मक्तेदार यांच्याशी चर्चा तर समारोपाचा कार्यक्रम मुंबई येथील सतारवादक शाकीर खान यांच्या वादनाने होणार आहे.

Related posts: