|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » क्षुल्लक कारणावरुन सहकाऱयाचा भोसकून खून

क्षुल्लक कारणावरुन सहकाऱयाचा भोसकून खून 

प्रतिनिधी/ मडगाव

क्षुल्लक कारणावरुन फातोर्डा येथे एका युवकाने आपल्या सहकाऱयाचा कात्रीने भोसकून खून केला. त्याप्रकरणी अमानुल्ला बेपारी (25, बंगळूर) या संशयिताला अटक करण्यात आली असून मयताचे नाव टॉनी (35) असे आहे.

शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मडगाव पोलीस स्थानकावर एका महिलेचा फोन आला. एका युवकाला भोसकण्यात आले आहे, अशी माहिती तिने  दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले असता जमिनीवर काही फुटलेल्या काचा पडलेल्या होत्या. तसेच भोसकण्यात आलेला युवक बेशुद्धावस्थेत होता व शेजारी त्याचा एक सहकारी उभा होता. भिंतीवरील घडय़ाळ जमिनीवर पडून फुटलेले होते. सदर काचा त्या घडाळाच्याच होत्या.

मात्र पोलिसांची नजर ज्या टोकदार काचेने भोसकण्यात आले होते ती काच शोधत होती. परंतु अशी काच कोठेच दिसत नव्हती. जखमी युवकाला पोलिसांनी हॉस्पिसियोमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी सदर युवकाच्या सहकाऱयाला ताब्यात घेतले.

चलाख संशयित आरोपी

मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या अनुभवी नजरेने संशयित खोटे बोलत असल्याचे कधीच ओळखले होते. कोणत्या शस्त्राने भोसकण्यात आले असे अनेकदा विचारले तेव्हा प्रत्येक वेळी तो काचेच्याच तुकडय़ाचे वर्णन करत होता. त्यानंतर तो विसंगत उत्तरे देऊ लागला आणि अखेर खऱया उत्तराकडे पोहोचला.

एव्हाना शुक्रवारची मध्यरात्र उलटून सुमारे 1.30 वाजले होते. जो संशयित सुरुवातीला काचेनेच भोसकले असे सांगत होता त्याला आता आपण पूरता कात्रीत सापडलो आहे याची जाणीव झाली व नंतर त्याने आपल्या गुह्याची कबुली दिली. कात्रीनेच आपण त्याला भोसकले असल्याची कबुली त्याने दिली.

हकिकत काय होती

हकिकत अशी की, आरोपी व सदर युवक एकाच ठिकाणी राहात होते. कचऱयातून प्लास्टिक बाटल्या वा तत्सम वस्तू गोळा करणे हा त्याचा धंदा होता. शुक्रवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी दोघेही दारु प्यायले होते. त्यानंतर टोनी हा आपल्या चेहऱयावरील दाढी करायला लागला. अचानक त्याने आपल्या सहकाऱयास आपली उर्वरित दाढी काढण्यास फर्मावले.

त्यावरून त्यांच्यात वाद झाला व टोनीने संशयिताला शिव्या दिल्या आणि पुन्हा एकदा दाढी काढण्यास फर्मावले. शिव्या असह्य झाल्याने संशयिताने त्याच्या हातातील कात्री खेचून घेतली आणि भोसकली.

हे प्रकरण अंगलट येणार याची कल्पना येताच संशयिताने कात्रीच्या जागी काचा असल्याचे कल्पनाचित्र तयार केले. मात्र अनुभवी पोलिसांपासून त्याचे हे कृत्य लपून राहू शकले नाही आणि अखेर मध्यरात्रीनंतर या खून प्रकरणाचा उलगडा झाला.

सात दिवस पोलीस कोठडी

संशयिताला शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते आणि नंतर रितसर अटक करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Related posts: