|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल 

केंद्रीयमंत्री धर्मेंद प्रधान यांना विश्वास

प्रतिनिधी/ वास्को

एकविसावे शतक हे भारताचे असून भारत जागतिक महासत्ता बनणार आहे. येणाऱया पाच वर्षांत संरक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती साध्य करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी केलेला संकल्प आम्ही सार्थ करणार आहोत, असा विश्वास केंद्रीय तेल व नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या ‘आयसीजीएस शौर्य’ या अत्याधुनिक गस्ती जहाजाचे लोकार्पण केल्यानंतर श्री. प्रधान बोलत होते.

गोवा शिपयार्डच्या धक्क्यावर शनिवारी सकाळी या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. तटरक्षक दलासाठी शिपयार्डकडून बांधण्यात येत असलेल्या सहा  जहाजांच्या मालिकेतील हे पाचवे गस्ती जहाज आहे.

लोकार्पण सोहळय़ास तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग, अतिरिक्त महासंचालक के. नटराजन, तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे उपमहासंचालक मनोज बाडकर, शिपयार्डचे अध्यक्ष शेखर मित्तल, नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी पुनित बहल, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधान यांनी पुढील भाषणात तटरक्षक दलाचे सागरी संरक्षणात असलेले महत्व, दलाचे कार्य, जगात या दलाला असलेला मान आणि दलाविषयी स्वत: घेतलेले अनुभव या गोष्टींवर भर दिला. शौर्य जहाज तटरक्षक दलाचे शौर्य वाढवेल अशी ग्वाही देत या जहाजाचा लोकार्पण सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. तटरक्षक दलाच्या समुद्री गस्तीचा बॉम्बे हाय सारख्या इंधन उत्खनन प्रकल्पाच्या ठिकाणी एक रात्र थांबून आपण अनुभव घेतला असून तेल आणि नैसर्गिक वायू खात्यालाही तटरक्षक दलाची गस्त गरजेची आहे. तटरक्षक दलाचे जागतिक महत्त्व आपल्याला व्हिएतनामच्या सुरक्षेच्या प्रश्नावरूनही अनुभवता आले. देशाच्या सागरी सीमा सुरक्षित असण्याला अत्यंत महत्त्व असून सुरक्षित सागरी गस्त असले तरच देश सुरक्षित राहू शकतो.

सुरक्षा संस्था आपल्या संरक्षण कार्यात कष्ट उपसत असतात. मात्र त्यांनाही कधी कधी टीका आणि आरोपांना सामोरे जावे लागते. त्यांच्या कष्टांची आम्हाला कल्पना नसते. त्यामुळे त्यांना हवा तसा मान मात्र आम्ही देऊ शकत नाही. सागरात संपत्ती असते. मात्र, ती केवळ असून चालत नाही. ती टिकवून ठेवण्यात देशाचे हित असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या पाच वर्षांत म्हणजेच देश स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरित देशात सर्वच क्षेत्रात भरीव प्रगतीचा संकल्प केलेला असून तो संकल्प आम्ही पूर्ण करूनच राहू. हे शतक भारताचेच राहणार असून भारतच जगाचे नेतृत्व करणार आहे, असेही प्रधान म्हणाले.

तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांनी यावेळी बोलताना भारतीय तटरक्षक दल सागरी सीमांच्या रक्षणाचे कार्य चोख पार पाडीत असल्याचे सांगून आयसीजीएस शौर्यमुळे दलाचे आत्मबल वाढणार असल्याचे सांगितले. तटरक्षक दल पार पाडीत असलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली. भारतीय तटरक्षक दलाकडे 129 गस्ती जहाजे असून 72 जहाजे देशातील विविध शिपयार्डमध्ये बांधली जात असल्याचे सांगून सिंग यांनी दलाची क्षमता आणि विस्ताराची माहिती दिली. यावेळी राजेंद्र सिंग यांनी केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कामगिरीची स्तुती केली. प्रधान यांच्याकडे कुशल नेतृत्वाचे गुण असून देशातील 700 जिल्हय़ांमध्ये त्यांनी  प्रधानमंत्री उज्जवला योजनेचे कार्य पोहोचवलेले आहे. 15 हजार किलो मिटर अंतराची वायूवाहिनी देशात जोडली जात असून जगासाठी हे एक आदर्श धोरण असल्याचे सिंग यांनी सांगितले.

गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रियर ऍडमिरल शेखर मित्तल यांनी यावेळी बोलताना गोवा शिपयार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मेक इन इंडिया धोरण राबवत असल्याचे सांगितले. श्रीलंकेचे गस्ती जहाज हस्तांतरण केल्यानंतर पंधरा दिवसातच तटरक्षक दलाचे शौर्य हस्तांतरीत करण्यात येत असून नियोजित वेळेच्या 31 दिवस आधीच हे जहाज सुपूर्द करण्यात येत आहे. गोवा शिपयार्डच्या कार्यक्षमतेत गोवा शिपयार्डचे कर्मचारी, कामगार, अधिकारी, कामगार संघटना या सर्वांचाच वाटा असल्याचे ते म्हणाले.

‘आयसीजीएस शौर्य’ गस्ती जहाज

‘आयसीजीएस शौर्य’ हे जहाज 105 मिटर लांब जहाज असून भारतीय तटरक्षक दलासाठी या जहाजाचा वापर सागरी गस्तीबरोबरच सागरी संपत्तीचे रक्षण करणे,  आग दुर्घटनांचा सामना करणे, सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवणे इत्यादी कर्तव्ये हे जहाज पार पाडणार आहे. या जहाजावर 13 अधिकाऱयांसह एकूण 112 कर्मचारी तैनात असणार आहे. या जहाजावर हेलिपॅडचीही सोय असून त्या दृष्टीने या जहाजाची बांधणी करण्यात आलेली आहे. या जहाजावर शस्त्रसामुग्रीही असेल. या जहाजाचा कायम तळ तटरक्षक दलाच्या पूर्व विभागीय नियंत्रणाखालील चेन्नई येथे असले. भारतीय तटरक्षक दलासाठी सहा अत्याधुनिक गस्ती जहाजे बांधण्याचा करार गोवा शिपयार्डने 9 मे 2012 रोजी केला होता. त्या करारानुसार आतापर्यंत तटरक्षक दलाने तीन गस्ती जहाजे तटरक्षक दलाकडे सुपूर्द केलेली असून अन्य तीन जहाजांचे जलावतरण झालेले आहे.

Related posts: