|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कपिलेश्वर ओक्हरब्रिजवर वाहतुकीची कोंडी

कपिलेश्वर ओक्हरब्रिजवर वाहतुकीची कोंडी 

बेळगाव / प्रतिनिधी

 वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी कपिलेश्वर ओव्हरब्रिजची निर्मिती करण्यात आली. परंतु आता या ओव्हरब्रिजवरच वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शनिवारी आठवडय़ाचा बाजार तसेच शनिमंदिरला येणाऱया भक्तांच्या गर्दीमुळे ओव्हरब्रिजवर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक कोंडीतून वाट काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते.

कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरील वाहतुकीची कोंडी ही नेहमीचीच समस्या आहे. शनिमंदिरजवळ अरूंद रस्ता असल्याने वाहतुकीच्या कोंडीमध्ये भर पडते. शनिवारी शनिमंदिरापासून एसपीएमरोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक मेटाकुटीला येत होते. सध्या धारवाड रोड उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने पूर्ण वाहतूक तानाजी गल्ली व कपिलेश्वर रोडमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे ओव्हरब्रिजवरून येणाऱया वाहनांची संख्या वाढली आहे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर

वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहूनही दुचाकी चालक आपली वाहने पुढे रेटत होते. हे वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहने हाकत असल्याने समोरून येणारी वाहने अडकून पडत होती. या बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी अधिकच तीव्र होत होती. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

 पोलिसांची दमछाक

शनिवारी आठवडी बाजार व शनिमंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱया भाविकांची गर्दी अधिक असते. यामुळे ओव्हरब्रिज वाहनांनी फुल्ल झाला होता. ही वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी 3 रहदारी पोलिस तैनात करण्यात आले होते. परंतु गर्दी अधिक असल्याने पोलिसांची पुरती दमछाक होत होती. त्यानंतर अधिक पोलिस बोलविण्यात आले होते.

Related posts: