|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » दीपस्तंभाप्रमाणे आचार्य अत्रे समाजाचे आधारस्तंभ

दीपस्तंभाप्रमाणे आचार्य अत्रे समाजाचे आधारस्तंभ 

पद्मभूषण अण्णा हजारे यांचा ध्वनिफितीद्वारे संवाद   साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्काराने अण्णा हजारे सन्मानित, मान्यवरांची उपस्थिती

प्रतिनिधी/ मुंबई

वयाच्या 14 व्या वर्षापासून आचार्य अत्रे यांची भाषणे ऐकली आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. समाजकारण आणि राजकारण हे वेगळे नसते तर, समाज आणि राष्ट्राचे हित एकच असते, हे आचार्य अत्रे यांनी दाखवून दिले. चारित्र्य, आचार-विचार शुद्ध असले की लेखणीला धार येते, ती अत्रे यांच्या लेखणीत होती. वादळी सागरामध्ये नौकेला जसा दीपस्तंभाचा आधार असतो, त्या दीपस्तंभाप्रमाणे आचार्य अत्रे समाजाचा आधारस्तंभ राहिले, असे गौरवोद्गार पद्मभूषण अण्णा हजारे यांनी काढले. पद्मभूषण पुरस्कार स्वीकारताना झालेल्या आनंदापेक्षाही अधिक आनंद हा पुरस्कार मिळाल्यावर झाला, असेही ते पुढे म्हणाले.

आत्रेय पुरस्कृत आचार्य अत्रे यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त पद्मभूषण अण्णा हजारे यांना ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे अण्णा हजारे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अण्णा हजारे यांनी ध्वनीफितीद्वारे संवाद साधला. त्यांच्यावतीने राळेगणसिद्धी गावाच्या सरपंच रोहिणी गाजरे यांनी हा सन्मान स्वीकारला.  यावेळी विशेष अतिथी केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, लेखिका मीना देशपांडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. वाय. पाटील, ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर, ऍड. राजेंद्र पै, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळय़े आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, किरण ठाकुर, डी. वाय. पाटील यांचा अत्रे कुटुंबाकडून सन्मान करण्यात आला.

मराठीमधील माझे आवडते लेखक म्हणजे आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे होय. विनोदी लेखन करणे कठीण असते. ती एक कला आहे. ती फार कमी लोकांना अवगत होते. त्यामध्ये आचार्य अत्रेंचा समावेश आहे. पेंब्रिज विद्यापीठात पीएचडी घेतली; त्यानंतर सुट्टीमध्ये मुंबई आल्यावर 1963 साली आचार्य अत्रे यांनी पहिला माझा सत्कार केला होता, अशा आचार्य अत्रे यांच्या आठवणी डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले की, अत्रेंचा महाराष्ट्राला विसर पडला आहे का, आचार्य अत्रे यांचे एखादे स्मारक समाजाला सरकारला उभारावे असे वाटले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी ‘अरुण वाचनमाला’ आणि डॉ. सुधीर मोंडकर लिखित ‘आचार्य अत्र्यांचे महान समकालीन’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अत्रे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गाजलेला ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा खुशाल कोंबडं झाकुन धरा’ हा पोवाडा आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत शाहीर कृष्णकांत जाधव यांनी सादर केले.

गौरवशाली इतिहासाचे दस्तावेजीकरण करायला पाहिजे : नितीन गडकरी

अत्रेंनी पत्रकार म्हणून परखडपणे काम केले; मग कोणतेही विचार असो. ते कोणाविरुद्धही असो; ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले. त्याकाळी नेत्यांची कोणतीही विचारधारा असली तरी नेते त्या विचारावर ठाम असत; मात्र आज विचारभिन्नता ही समस्या नसून विचारशून्यता ही मोठी समस्या असल्याचे गडकरी म्हणाले. अत्रे त्यांच्या आयुष्यात कधीही खोटे बोलले नाहीत. यावेळी गडकरी यांनी आपल्याला त्यांच्याविषयी भावलेले वाक्य म्हणजे ‘उद्या जर माझी समाधी बांधायची ठरवली तर त्यावर लिहा की हा माणूस मूर्ख असेल, त्याच्या हातून चुका झाल्या असतील; मात्र कृतघ्न कधीही झाला नाही,’ यावरून अत्रे यांच्या स्वभावाची प्रचिती येते.

आपल्या हातून कळत-नकळत चूक होते ती म्हणजे आपण वर्तमानकाळातील गौरवशाली इतिहास त्यानंतरच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचेल, याचा सर्वंकष विचार करायला पाहिजे तेवढा केला जात नाही, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली. त्यामुळे गौरवशाली इतिहासाचे दस्तावेजीकरण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच मराठी नाटक आता पुढे येत नाही. महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की प्रत्येक जिल्हय़ात एक सभागृह; जे मराठी साहित्य, नाटक आणि मराठी कार्यक्रमासाठी दोन ते अडीच हजार रुपयात मिळाले पाहिजे. असे झाले तर मराठी नाटक खूप पटीने पुढे जाईल. ही आपली सर्वात मोठी दौलत आहे, असेही ते म्हणाले. अत्रे साहेबांचा वारसा हा साहित्यिकांचा, पत्रकारांचा, चित्रपट निर्मात्याचा, विडंबनकारांचा आहे. अत्रे ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी शिखरच गाठले. त्याहीपेक्षा त्यांचे निखळ व्यक्तिमत्त्व, जीवनातील सचोटी आणि प्रामाणिकपणा भावला. कुठेही आत एक बाहेर एक असे कधीच वागले नाही. राजकारणात खोटारडय़ांची संख्या कमी नाही. पण अत्रे यांनी कधीच खोटे आश्वासन दिले नाहीत. दरम्यान, अत्रे यांचे विविध पैलू नितीन गडकरी यांनी उलडून दाखवले.