|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाली’ केंद्राच्या भूकंपाला यशवंतरावांची साथ

पाली’ केंद्राच्या भूकंपाला यशवंतरावांची साथ 

लांजा निवडणुकीनंतर नवा उलगडा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लांजा नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष शिवसेनेचा होण्यामागे ‘पाली’ हेच राजकीय भूकंपाचे केंद्र आहे की, आमदार साळवी चाणक्य या बाबत अद्यापही चर्चा रंगत आहेत. या बाबत आणखी काही उलगडे बाहेर पडत असून ‘पाली’ हेच राजकीय समीकरणाचे केंद्र होते व किरण सामंत यांची मोर्चेबांधणी यशस्वी ठरल्याचे ठामपणे बोलले जात आहे. याचदरम्यान आघाडीची निर्णायक 4 मते शिवसेनेकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांचा हात असल्याचा एक नवा उलगडा समोर येत आहे.

लांजातील नगराध्यक्षपदाचे चित्र अचानक बदलून शिवसेनेचा उमेदवार कसा झाला? या बाबत सारेच अचंबित झाले आहेत. शिवसेनेच्या निशाणीवर निवडून आलेला सदस्यच लांजाचा नगराध्यक्ष करण्याचे शिवसेना पक्षात निश्चित झाले होते. त्यानुसार राजकीय घडामोडींना वेग आला. राजू कुरूप इच्छुक असताना शिवसेनेच्या काहींची इच्छा होती की, संपदा वाघधरेंना शिवसेनेत घेऊन नगराध्यक्ष करायचे. मात्र शिवसेनेतील काहींचे हे मनसुबे धुळीस मिळाल्याचे समजते.

शिवसेनेकडून कुरूप यांनी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला. त्यावेळी सेनेकडे स्वत:ची 6 मते होती आणि आघाडीकडे 11 मते होती. मग यातील 4 मते सेनेकडे वळविण्यात नेमके कोणाचे राजकीय गणित यशस्वी ठरले? हे मोठे कोडे अनेकांना पडले होते. या बाबत शिवसैनिकांमध्ये कुजबुज सुरू आहे. राजू कुरूप हे किरण सामंतांना भेटले आणि त्यांनी तुम्ही पुढाकार घेतला तर नगराध्यक्षपदाचा फॉर्म मागे न घेण्याचे सांगितले. त्यानुसार किरण सामंतांनी खासदारांशी चर्चा केली. नगराध्यक्षपदाची उमेदवारी सेनेच्याच निशाणीवर निवडून आलेल्या सदस्याला देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यानंतर घडामोडींना वेग आला, अशीही चर्चा शिवसेनातंर्गत सुरू आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली किरण सामंत यांनी परवेश घारे आणि विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर कवचे यांची भेट घेतली आणि खासदार राऊतांशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या संमतीनंतर आमदार उदय सामंत, परवेश घारे, किरण सामंत, राजू कुरूप यांची पाली व रत्नागिरी रेस्ट हाऊसला बैठक झाली. त्यानंतर पुढील घडामोडी घडल्या. ज्याद्वारे मतांची एकूण संख्या 6 वरून 10 वर पोहोचली. त्यानंतर या सर्वच्या सर्व म्हणजे 10 नगरसेवकांना आंबाघाटात गुप्तपणे ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

  या साऱयाची कुणकुण संदीप दळवी, जगदीश राजापकर, गुरूप्रसाद देसाई यांना लागली आणि त्यांनी याची खबर आमदार राजन साळवींपर्यंत पोहोचवली. लांजातील सेनेचे मताधिक्क्य 10 वर पोहोचणार याची निश्चिती पालीकरांकडून झाल्यानंतर मग आमदार साळवी यांनी लांजामध्ये येऊन 2 †िदवस मुक्काम ठोकला. या दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री देवधेत खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, विलास चाळके, किरण सामंत यांची बैठक झाली. या बैठकीत खासदार राऊत यांनी उपनगराध्यक्षपदासाठी मनोहर कवचे यांचे नाव जाहीर केले आणि ते दिल्लीला मार्गस्थ झाले, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव यांचे आमदार सामंतांशी संबंध खूप जुने व विश्वासाचे आहे. त्याचा उपयोग करून त्यांनी लांजातील काही नगरसेवकांना शिवसेनेच्या बाजूने वळविल्याची कूटनीती राबवल्याचे सांगितले जात आहे. यशवंतराव यांनी जुन्या अनुभवावरून सामंत यांना रसद पुरवल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीत किरण सामंत यांनी केलेल्या मोर्चेबांधणीप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी राजू कुरूप यांना शिवसेनेची 6 व वळवून आणलेली आघाडीची 4 मते प्राप्त होऊन शिवसेनेचे राजू कुरूप नगराध्यक्षपदी निवडून आले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्या ठिकाणी 2 दिवसांपासून मुक्काम ठोकून उपस्थित असलेल्या आमदार राजन साळवी यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन या सर्व घडामोडींचे चाणक्यपद आपल्याकडे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात, तसेच शिवसेनेच्या गोटात रंगत आहे. याचबरोबर आमदार साळवी यांनी त्वरित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना थेट ‘मातोश्री’वर नेऊन त्यांची भेट पक्षप्रमुखांशी घालून देण्यात अचूक यश नेमकेपणे मिळवले. मात्र या बाबत आमदार सामंत यांच्या समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: