|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काँग्रेस शहर अध्यक्षाकडून दोघा तरुणांना मारहाण

काँग्रेस शहर अध्यक्षाकडून दोघा तरुणांना मारहाण 

प्रतिनिधी/ मालवण

पैशांच्या देवघेवीवरून काँग्रेसचे मालवण शहर अध्यक्ष लिलाधर बाळकृष्ण पराडकर यांनी दांडी आवार येथील केबल व्यावसायिक कृष्णा शिवराम सादये (49) आणि मच्छीमार व्यावसायिक परेश अरुण वाघ (34) यांना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मारहाण केली. यात सादये यांच्या डोळय़ाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत या दोघांनीही पराडकर याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

दरम्यान, सादये यांना मारहाण झाल्यानंतर ते मोटारसायकलवरून पडून त्यांच्या डोळय़ाला दुखापत झाल्याने पराडकरविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही तक्रारींप्रकरणी पराडकरवर भादंवि कलम 323, 504, 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

वाघ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लिलाधर पराडकर याचे पैसे देण्यास उशीर झाल्याने त्याने बोटीचे इंजिन काढून घेतले होते. घराकडून पैसे आणण्यास उशीर झाल्याने आपल्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर सादये याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, केबलचे पैसे मागतो, याचा राग मनात ठेवून पराडकर याने मारहाण केली. दुचाकीची केबल बदलत असताना पराडकर याने लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने गाडीवरून ढकलून दिल्यानंतर डोळय़ाला दुखापत झाली. सादये याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

याप्रकरणी मालवण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सादये व वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक पंकज सादये, महिला बालविकास सभापती तृप्ती मयेकर, तपस्वी मयेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी पोलीस ठाण्यात येऊन दोघांचीही विचारपूस केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक नागरगोजे व संतोष गलोले करीत आहेत.

Related posts: