|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आरजीपीपीएलचा पाणीपुरवठा बंद! मिरजोळीत पाईपलाईन फुटली,

आरजीपीपीएलचा पाणीपुरवठा बंद! मिरजोळीत पाईपलाईन फुटली, 

शेतीचे नुकसान, भरपाईची शेतकऱयांची मागणी, दुरूस्तीचे काम करू न देण्याचा इशारा

प्रतिनिधी /चिपळूण

आरजीपीपीएलला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दोन दिवसांपूर्वी मिरजोळी येथे फुटली असून त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याची जोपर्यंत भरपाई मिळत नाही तोपर्यंत दुरूस्तीचे काम करू न देण्याचा इशारा संबंधित शेतकऱयांनी दिला आहे. शेतकऱयांच्या या आक्रमक भुमिकेने कंपनीचा पाणीपुरवठा बंद पडला आहे.

शिरळ येथील पंपहाऊसमधून या कंपनीला गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठा सुरू आहे. शिरळपासून आरजीपीपीएलपर्यंत काही किलोमीटरची पाईपलाईन गेली असल्याने अनेकदा ती फुटण्याचे प्रकार घडतात. मात्र संबंधित ठेकेदार तातडीने तिची दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे त्याची झळ कंपनीला बसत नाही.

दोन दिवसांपूर्वी मात्र मिरजोळी येथे एका भातशेतीलगतच ही पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे या शेतीचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत महाजनको ही नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत लाईनच्या दुरूस्तीचे काम करू देणार नाही, अशी भूमिका संबंधित शेतकऱयाने घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे काम रखडले असून कंपनीचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे.