|Monday, June 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उठा! राष्ट्रवीर हो!

उठा! राष्ट्रवीर हो! 

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दुष्ट शत्रू मारूनी तयास देउ आहुती देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला, उठा, राष्ट्रवीर हो! प्रख्यात मराठी कवी रवींद्र भट यांचे हे काव्य. या संपूर्ण गीताला लावण्यात आलेली चाल आणि त्यातून निर्माण होणारे वातावरण सर्वसामान्य जनतेच्या मनात देशासाठी पेटून उठण्याची प्रेरणा देत राहते. आज भारतीय स्वातंत्र्याने सात दशके पूर्ण केल्यानंतर बदलत्या परिस्थितीत, बदलत्या वातावरणात नव्याने प्रत्येकाच्या मनात व हृदयात ‘उठा राष्ट्रवीर हो!’ अशी साद घालण्याची वेळ आलेली आहे, हे खरोखरच दुर्दैव आहे. एका बाजूने पाकिस्तान सातत्याने व नित्यदिनी कुरघोडी करीत आहे. काश्मिरातील जनता ही पाकिस्तान्यांना स्वकीय वाटते. त्यामुळे भारताच्या विरोधात सातत्याने संघर्ष व युद्ध करण्याची खुमखुमी पाकिस्तान्यांना असते व त्यासाठी त्यांनी एवढी वर्षे चीनकडून छुपा पाठिंबा मिळविला. आता तर खुला पाठिंबाच मिळविलेला आहे. भारतापासून काश्मीर तोडण्यासाठी पाकिस्तान गेली साडेसहा दशके प्रयत्न करीत आहे. त्यात प्रत्येकवेळी त्यांना अपयश आलेले आहे व आता पाकिस्तानचा थोरला भाऊ चीन आपले जाळे विस्तारण्यासाठी आर्थिक बळाच्या जोरावर भारताशी युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहे. चीनशी युद्ध हे भारताला परवडणारे नाही. चीन सातत्याने, डोकलाममधील भारतीय सैन्य हटवा नाही तर त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जा, असा इशारा देऊन भारताशी युद्ध करण्यासाठी दोन हात करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी केंद्र सरकारने या वर्षीपासून भारतीय स्वातंत्र्यदिन कशा पद्धतीने साजरा करायचा याविषयी काही मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्यांना परिपत्रकाद्वारे पाठविली. यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांचा तीळपापड का व्हावा? केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर असल्यामुळे त्या सरकारने पाठविलेल्या कोणत्याही नियमांचे पालन करायचे नाही, असा विडा उचललेल्या ममतांनी खुद्द स्वातंत्र्यदिन सोहळय़ासंदर्भातील परिपत्रकाला केराची टोपली दाखविण्याचा निर्णय घेतला आहेच शिवाय त्यांनी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना केंद्राच्या आदेशाचे पालन करू नये, अशी सूचना देऊन आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडविले आहे. आपण आज सारे तिरंग्यासमोर नतमस्तक होतो. या देशाला स्वातंत्र्याचा फार मोठा इतिहास लाभलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारो महान विभूतींनी आपले सर्वस्व अर्पण केलेले आहे. त्यांच्या त्यागातूनच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. आजच्या बदलत्या युगात देशाबद्दलचा अभिमान आपण हरवत बसलो आहोत. थोर स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या त्यागाची आपल्याला कल्पना नाही. अनेकांना त्याची जाणीव राहिलेली नाही. स्वातंत्र्यासाठी काढलेल्या हालअपेष्टांचे चटके गेल्या सहा दशकात कोणाला बसले नसावेत. एकंदरीत ‘राष्ट्रभक्ती’ हा विषयच आज सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनतो आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्या विरोधात केलेली टीकाही सोशल मीडियावर स्वागतार्ह ठरविली जाते, हा प्रकार भयावह आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढय़ाने आपल्याला काय दिले असा प्रश्न करणारे महाभागही गेल्या सात दशकात जन्माला आले व त्यातले काही राजकारणी बनले. काहीजणांनी राष्ट्रभक्ती ही आपलीच मक्तेदारी बनविली तर काहींनी राष्ट्रविरोधात घोषणा देणाऱयांना एकगठ्ठा मतांसाठी कुरवाळण्याचे काम केले. त्यामुळेच आज सात दशकानंतरही काश्मीर हा भारताचा भाग बनला तरी तो भारताशी समरस झालेला नाही. व्यापक विचाराने व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विचारांमुळे भारतीय विचारसरणीवर सातत्याने होत असलेल्या आघातामुळे भारतीय संस्कृती आज प्रचंड दबावाखाली वावरत आहे. लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकशाहीने आपल्याला दिलेल्या केवळ अधिकारांचीच जाणीव होते व ठरवून दिलेल्या कर्तव्याची मात्र आठवण होत नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या सातव्या दशकपूर्तीनंतरही आज देशातील राज्यांना भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा गंभीरपणे घ्या व काही नवे उपक्रम राबवा, हे सांगण्याची पाळी यावी, हे दुर्दैव आणि केंद्राने त्या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकावरून नेमकी उलटी भूमिका घेण्याची ममता बॅनर्जी यांची भूमिका ही देखील अत्यंत दुर्दैवी आहे. ममता या प. बंगालच्या मुख्यमंत्री आहेत केवळ तृणमूलच्या अध्यक्ष नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. त्यांच्या या भूमिकेचे कोणते विपरीत परिणाम या देशावर होतात, याची त्यांना जाणीव नाही. बंगालमधील काही मुस्लिम धर्मगुरुंनी स्वातंत्र्यदिन साजरा करा परंतु राष्ट्रगीत म्हणू नका, असा फतवा जारी केला आहे, भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा हा प्रकार आहे. ममतांच्या दुर्दैवी निर्णयातून अशा घटकांना प्रोत्साहन मिळते. ममतांना फार मोठय़ा समस्येला सध्या तोंड द्यावे लागत आहे व ते म्हणजे शेजारील बांगलादेशमधून सातत्याने प. बंगालमध्ये होत असलेली घुसखोरी. अशावेळी युवकांमध्ये नसानसात राष्ट्रचैतन्य निर्माण करण्याचे सोडून केवळ राजकारणातच गुरफटून बसलेल्या ममतांसारख्या अनेक छुप्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. रवींद्र भटांनी अनेक काव्ये लिहिली. त्यात गर्भितार्थ भरलेला आहे. ‘उठा, राष्ट्रवीर हो! सज्ज व्हा, उठा चला!’ असे सांगून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीचे यज्ञकुंड पेटविण्याचे काम या महान कवींनी केले. ‘दुष्ट शत्रू मारुनी तयास देऊ आहुती’-स्वातंत्र्याच्या या यज्ञकुंडात दुष्टांची आहुती देण्यास राष्ट्रवीर हो तुम्ही सज्ज व्हा, असा नारा त्यांनी दिला. आज भारतीय स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर परिस्थिती वेगाने बदलत आहे. सारे जग तिसऱया महायुद्धाच्या उंबरठय़ावर आहे. चीन भारतावर आणि उत्तर कोरिया, जपान-अमेरिकेवर कधीही विनाशकारी हल्ला चढविल हे कळणार नाही. भारत-चीन युद्ध चालू असताना पाक आपले सैनिक भारतात घुसविण्याची तयारी करीत आहे. या साऱया पार्श्वभूमीवर देशातील साऱया जणांनी या देशासाठी, या तिरंग्यासाठी एकत्र येणे गरजेचे नाही काय?