|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » अवघ्या अडीच दिवसातच स्वातंत्र्यदिनाची भेट!

अवघ्या अडीच दिवसातच स्वातंत्र्यदिनाची भेट! 

विदेशी भूमीत भारताचा प्रथमच क्लीन स्वीप, तिसरी कसोटीही डावाने जिंकली,  यजमान श्रीलंकेविरुद्ध 3-0 फरकाने बाजी

वृत्तसंस्था/ पल्लेकेले

येथील तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातही भारताने तुलनेने दुबळय़ा श्रीलंकन संघाचा तब्बल एक डाव व 171 धावांनी फडशा पाडत 3-0 अशा फरकाने दणकेबाज क्लीन स्वीप नोंदवला. या मालिकेतील तीनपैकी एकही सामना पाचव्या दिवसापर्यंत झाला नाही, हे ठळक वैशिष्टय़ ठरले. ही शेवटची कसोटी तर भारताने अवघ्या अडीच दिवसातच जिंकली आणि स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठय़ावर तमाम भारतीय चाहत्यांना मालिकाविजयाची हवीहवीशी भेट दिली. लंकेचा दुसरा डाव 74.3 षटकात सर्वबाद 181 धावांवरच आटोपला. हार्दिक पंडय़ा सामनावीर तर मालिकेत दोन शतके झळकवणारा शिखर धवन मालिकावीराचा मानकरी ठरला.

यजमान संघाने सोमवारी या लढतीच्या तिसऱया दिवशी 1 बाद 19 या कालच्या धावसंख्येवरुन 352 धावांच्या पिछाडीसह डावाला सुरुवात केली खरी. पण, चहापानापूर्वीच दुसरा डावही गडगडल्याने त्यांच्या संघर्षाला थोडीफारही धार नसल्याचे स्पष्ट झाले. उमेश यादव (2/21), मोहम्मद शमी (3/32) यांनी प्रारंभी झटके दिल्यानंतर लंकन संघासमोर त्यातून सावरताच आले नाही. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (4/68) व चायनामन कुलदीप यादव (1-56) यांनी लंकन संघाच्या मर्यादा आणखी उघड केल्या.

उपाहारासाठी खेळ थांबवला गेला, त्यावेळी लंकन संघाची 4 बाद 82 अशी पडझड झाल्याने या सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळाची आवश्यकता नसेल, हे त्याचवेळी जवळपास निश्चित झाले होते. यामुळे, रविवारपासून खेळवल्या जाणाऱया 5 सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी दोन्ही संघांना आणखी दोन दिवसांची विश्रांती मिळेल, हे देखील सुस्पष्ट झाले.

उपाहारानंतर कर्णधार दिनेश चंडिमल (36) व मॅथ्यूज (35) यांनी पाचव्या गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी जरुर केली. पण, यामुळे पराभव लांबवण्याशिवाय फारसे काही साध्य झाले नाही. या जोडीने 49 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले, हाच काय तो एकमेव दिलासा ठरला. त्यानंतर कुलदीपने चंडिमलला डावातील 51 व्या षटकात शॉर्टलेगवरील पुजाराकरवी झेलबाद केले तर अश्विनने मॅथ्यूजला पायचीत करत ही जोडीच फोडून काढली. 41 धावांचे योगदान देणाऱया निरोशन डिकवेलाने थोडीफार फटकेबाजी केली. मात्र, दुसऱया बाजूने गडी बाद होण्याचा सिलसिला सुरुच राहिल्यानंतर त्याच्या प्रयत्नावर अर्थातच मर्यादा होत्या.

दिलरुवन परेरा (8) पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱया डावातही अश्विनच्या गोलंदाजीवर मिडविकेटकडे झेल देत तंबूत परतला. पुढे शमीने लक्शन संदकनला (8) यष्टीमागे झेल देणे भाग पाडले. उमेश यादवच्या डावातील 70 व्या षटकात अजिंक्य रहाणेने अप्रतिम झेल टिपत डिकवेलाची खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर अश्विनने लवकरच लहिरु कुमाराचा (10) त्रिफळा उडवत भारताच्या देदीप्यमान विजयावर शिक्कामोर्तब केले.

धावफलक

भारत पहिला डाव : सर्वबाद 487.

श्रीलंका पहिला डाव : सर्वबाद 135.

श्रीलंका दुसरा डाव : (1 बाद 19 वरुन पुढे) दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे, गो. अश्विन 16 (48 चेंडूत 3 चौकार), उपूल थरंगा त्रि. गो. उमेश यादव 7 (31 चेंडूत 1 चौकार), मलिंदा पुष्पकुमारा झे. साहा, गो. शमी 1 (32 चेंडू), कुशल मेंडिस पायचीत गो. शमी 12 (21 चेंडूत 2 चौकार), दिनेश चंडिमल झे. पुजारा, गो. कुलदीप 36 (89 चेंडूत 4 चौकार), अँजिलो मॅथ्यूज पायचीत गो. अश्विन 35 (96 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), निरोशन डिकवेला झे. रहाणे, गो. उमेश यादव 41 (52 चेंडूत 5 चौकार), दिलरुवन परेरा झे. पंडय़ा, गो. अश्विन 8 (23 चेंडूत 1 चौकार), लक्शन संदकन झे. साहा, गो. शमी 8 (24 चेंडूत 2 चौकार), विश्वा फर्नांडो नाबाद 4 (17 चेंडू), लहिरु कुमारा त्रि. गो. अश्विन 10 (15 चेंडूत 2 चौकार). अवांतर 3. एकूण 74.3 षटकात सर्वबाद 181.

गडी बाद होण्याचा क्रम

1-15 (थरंगा, 10.4), 2-26 (करुणारत्ने, 15.3), 3-34 (पुष्पकुमारा, 20.2), 4-39 (कुशल मेंडिस, 22.5), 5-104 (चंडिमल, 50.3), 6-118 (मॅथ्यूज, 54), 7-138 (दिलरुवन, 59.3), 8-166 (संदकन, 68.3), 9-168 (डिकवेला, 69.5), 10-181 (कुमारा, 74.3).

गोलंदाजी

मोहम्मद शमी 15-6-32-3, रविचंद्रन अश्विन 28.3-6-68-4, उमेश यादव 13-5-21-2, कुलदीप यादव 17-4-56-1, हार्दिक पंडय़ा 1-0-2-0.

Related posts: