|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मैनुद्दीन मुल्लाच्या नार्कोची शक्यता

मैनुद्दीन मुल्लाच्या नार्कोची शक्यता 

विशेष प्रतिनिधी / सांगली

वारणानगर येथील नऊ कोटी 18 लाखाच्या महाढलपा प्रकरणी अनेक दिवसांनी हाती लागलेल्या आरोपी मोहीद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला याच्या नार्को चाचणीची मागणी तपास यंत्रणेकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांवर आपसंपदेची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.

वारणानगर येथून कोटय़वधीची चोरी करून मिरजेत ऐषारामात राहणाऱया मोहीद्दीन बागवान याला सांगली एलसीबीच्या पथकाने 12 मार्च 2016 रोजी अटक केली होती. मात्र मोहीद्दीनलाच हाताशी धरून 1 कोटी रूपये देण्याच्या बदल्यात वारणानगर येथील बंद फ्लॅटमधून कोटय़वधी रूपये पोलिसांनीच लाटले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सपोनि चंदनशिवे व इतर पोलिसांना अटक झाली आहे. या प्रकरणात पकडलेले व गायब पोलीस अधिकारी व कर्मचारी तपास कामात वाकबगार असल्याने शिवाय अटक होताना सीआयडीच्या तपासात अडथळा कसा आणता येईल अशी व्यूहरचना आखून एक, एक पोलीस हजर होऊ लागल्याने सीआयडीला हा गुन्हा साबित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

खात्यातीलच आरोपींच्या या रणनितीला परतवून लावण्यासाठी सीआयडीचे प्रभारी पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून अधिकाऱयांना पाचारण करून तपास चालविला आहे. चोरी झालेली रक्कम कोटय़वधी रूपयांची आहे. शिवाय त्यात पोलिसांचाच सहभाग असल्याने हा गुन्हा कोर्टात सिध्द करताना पोलिसांना मोठी तयारी करावी लागणार आहे. अनेक दिवस बेपत्ता असणारा मोहीद्दीन मुल्ला अलगदपणे सीआयडीने पुण्यातून उचलून आणला, पाठोपाठ पोलिसांच्या घरांवर छापे टाकून महत्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यामुळे हा तपास केवळ एकाच मार्गाने नव्हे तर अनेक मार्गाने केला जाईल हे स्पष्ट होऊ लागले आहे.

पोलीस देणार होते एक कोटी!

या तपासात आतापर्यंत पुढे आलेल्या मोहितीनुसार मोहीद्दीनला मिरजेत पकडल्यानंतरही काही कॅश पोलिसांनी खासगी वाहनातून आणली होती. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीत चिक्कोडी येथील हवालाची रक्कम असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात पोलिसांचे पथक वारणानगरात होते. मात्र त्याची नोंद पोलीस मुख्यालयात केली नव्हती. वारणानगरातील बंद फ्लॅटमधून आणखी रक्कम चंदनशिवे व इतर पोलीस पथकाने काढून घेतली. दुसऱया दिवशी निरीक्षक घनवट यांना शंका आल्याने त्यांनीही मोहीद्दीनला घेऊन वारणानगर गाठले आणि दुसऱयांदा बंद फ्लॅटमधून पैसे काढून घेण्यात आले. हे पैसे आणण्यासाठी आष्टा येथून पोती व बॅगा खरेदी केल्या असून दोन दिवसात जप्त केलेली पूर्ण रक्कम हडप केल्याचा आरोप आहे. याकाळातील पोलिसांचे मोबाईल लोकेशन चिक्कोडी नसून वारणानगरच दाखवत आहे. वारणा संकुलातीलच दुसऱया एका फ्लॅटमध्येही असलेली रोकड आणण्यासाठी काही पोलीस गेले मात्र तेथील सिक्युरिटीची जबाबदारी एका निवृत्त पोलीस अधिकाऱयाकडे असल्याने तिथे गाजावाजा झाला आणि नाईलाजाने सांगली एलसीबीला वारणानगरच्या पोलिसांना बोलवावे लागले. सिसीटीव्हीमुळे तेथून रक्कम उचलता आली नाही.

दरम्यान, जेलमधून बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडे ठरल्याप्रमाणे मोहीद्दीन एक कोटी रूपये मागण्यासाठी आला त्यांनी ते दिले नाहीत. त्यामुळेच याची कल्पना मोहीद्दीनने फिर्यादी बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांना दिली. त्यांच्या तक्रारीची चौकशी थांबविण्यात टीम घनवट यशस्वीही ठरली होती. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी विश्वास नांगरे-पाटील दाखल होताच त्यांनी या प्रकरणी कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधिक्षक सोहेल शर्मा यांना तपासाचे आदेश दिले आणि या प्रकाराला वाचा फुटली. सीआयडीला आता तपासातील या सर्व माहितीला सिध्द करण्यासाठी मोहीद्दीनच्या नार्को आणि बेनमॅपिंगची आवश्यकता असून ते याची मागणी न्यायालयाकडे कधी करतात याकडे सांगली, कोल्हापूर जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी कोर्टात म्हणणे मांडताना मोहिद्दीनच्या वकिलांनी काही मुद्दे आरोपी पोलीस अधिकाऱयांबाबत मांडले आहेत. त्यामुळे मोहिद्दीनला पकडल्यापासून रक्कम ढापल्यापर्यंतच्या प्रकरणातील सर्व बाबी सिध्द करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मोहिद्दीनची नार्को आणि ब्रेनमॅपिंगची मागणी तपास यंत्रणेकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आरोपी पोलिसांचे बँक व्यवहार, जमीन व अन्य खरेदी, विक्रीचे व्यवहारही तपासात येत आहेत. त्यामुळे या पोलिसांच्या कुटुंबीयांवरही आपसंपदेची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कवलापूर येथे हवालदार दीपक पाटील याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. याशिवाय सांगली एलसीबीतील इतर 16 पोलीस कर्मचाऱयांकडेही तपासणी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे सीआयडीच्या तपासातून आणखी काय माहिती पुढे येते याकडे पोलीस दलाचेही लक्ष लागले आहे.