|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नूतन जिल्हाधिकाऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

नूतन जिल्हाधिकाऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हाधिकारीपदी झियाउल्ला एस. यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱयाची सूत्रे प्रभारी जिल्हाधिकारी आर. रामचंदन यांच्याकडून घेतली. पहिल्याच दिवशी त्यांच्याशी वार्तालाप करताना विकासाबाबत विचारणे गरजेचे होते. पण नेहमीच कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱया एका कन्नड वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सुरुवातीलाच म. ए. समिती आणि मराठी भाषिकांबद्दल तुमचे मत काय? असा सवाल करून आपल्या अकलेचे तारे तोडले.

जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी मी प्रथम एक जिल्हाधिकारी आहे. त्यामुळे जिल्हय़ातील गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. येथील भाषावाद मला चांगला माहीत आहे. यापूर्वी मी चिकोडीमध्ये तीन वर्षे 4 महिने प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. बेळगावपेक्षाही चिकोडीमध्ये अधिक मराठी भाषिक आहेत. त्याठिकाणी मी साऱयांनाच योग्यप्रकारे वागणूक दिली आहे. त्यामुळे भाषिक वादाबद्दल मला काही सांगायचे नाही, असे सांगून त्या कन्नड माध्यमाच्या प्रतिनिधीला चांगलीच चपराक दिली. महत्त्वाचे म्हणजे मंडय़ामध्ये मी दोन वर्षांहून अधिकवेळ जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. एकूण मी 20 वर्षे आतापर्यंत सेवा बजावली आहे. त्या अनुभवावर मी जिल्हय़ातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.पूर्वीचे जिल्हाधिकारी मराठी भाषिकांबद्दल आक्रमक होते. ते येथे कन्नड सक्ती करण्यासाठी नेहमीच अग्रेसर होते. महानगरपालिकेमधेही कन्नड नाडगीत म्हणावे यासाठी त्यांनी जोर केला होता. तुम्हीही यापुढे अशाच प्रकारे काम करा, असे त्या नेहमीच अधिकाऱयांची दिशाभूल करणाऱया कन्नड माध्यमाच्या प्रतिनिधीने सांगितले. त्यावर मी नियमानुसार काम करणार आहे. सरकारचा जसा आदेश येईल त्यापद्धतीनेच काम करेन. विकासकामांकडे जास्त लक्ष देईन, असे त्यांनी सांगितले. त्या कन्नड माध्यमाच्या प्रतिनिधीच्या या बोलण्यामुळे कन्नड पत्रकार आणि मराठी पत्रकार नाराज होऊन माघारी परतले.

जिल्हाधिकाऱयांनी अशा पत्रकारांना दूर ठेवणे गरजेचे

जिल्हय़ामध्ये कोणताही नवीन अधिकारी आला की, त्यांना मराठी भाषिकांच्या विरोधात भडकविण्याचेच काम काही मोजकेच कन्नड माध्यमाचे प्रतिनिधी करत आहेत. मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करून ब्रेकिंग न्यूज करण्यासाठी ते नेहमी धडपडत असतात. एकूणच दोघांमध्ये भांडण लावून स्वत:ची संधी साधून घेण्याचा प्रयत्न हे पत्रकार करत आहेत. तेव्हा अशा पत्रकारांना जिल्हाधिकाऱयांनी दूर ठेवणे गरजेचे आहे. नवीन जिल्हाधिकाऱयांचे स्वागत जिल्हा पंचायतीचे सीईओ आणि प्रभारी जिल्हाधिकारी आर. रामचंद्रन यांनी केले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्यासह इतर अधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले. विविध संघटनांनीही  जिल्हाधिकाऱयांचे स्वागत केले.

Related posts: