|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » 1000 इ कारसाठी सरकारने मागवली जगभरातून निविदा

1000 इ कारसाठी सरकारने मागवली जगभरातून निविदा 

प्रतिनिधी/नवी दिल्ली

एकदा चार्ज झाल्यानंतर 150 कि. मी. पर्यंत धावू शकणाऱया 10,000 इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी उर्जा कार्यक्षम सेवा लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने जगभरातून निविदा मागवली आहे. 2030 पर्यंत भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार उतरवण्याच्या उर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने ईईएसएलने हे मोठे पाऊल उचलले असून सरकारी विभागासाठी या गाडय़ांचा वापर करण्यात येणार आहे.

यापूर्वी उर्जा बचतीसाठी एलईडी दिव्यांना लोकप्रिय बनवणे आणि नाटकीय ढंगाने त्यांच्या किमती घटवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा ईईएसएलने यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. ईईएसएलची दोन टप्प्यात ई कार खरेदीप्रक्रिया राबवण्याची योजना असून पहिल्या टप्प्यात 1000 वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. कंपनीने 3000 एसी (अल्टरनेट करंट) आणि 1000 डीसी (डायरेक्ट करंट) साठीही निविदा प्रसिद्ध केली आहे.

ईईएसएल चार दरवाजेयुक्त ई सेडान कारच्या शोधात आहे. जे एकदा संपूर्ण चार्ज झाल्यास 120 ते 150 किमी अंतर धावू शकेल. पहिल्या टप्प्यात फक्त दिल्ली आणि एनसीआरमधील सरकारी विभागाकरिता 1000 ई कार खरेदी करण्यात येईल. या वाहनांसाठी दिल्लीच्या वेगवेगळय़ा भागात 4000 चार्जस बसवण्यात येणार असून त्यासाठी एनटीपीसी आणि  पॉवरग्रीडची मदत घेण्यात येणार असल्याचे ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ शुक्ला यांनी सांगितले.