|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी थरंगाकडे नेतृत्व

भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी थरंगाकडे नेतृत्व 

लंकन संघाची घोषणा, 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत रविवारी, यजमान संघाचीच खरी ‘कसोटी’

वृत्तसंस्था/ पल्लेकेले

येत्या रविवारपासून डम्बुला येथे खेळवल्या जाणाऱया 5 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी लंकेने आघाडीचा फलंदाज उपूल थरंगाकडे 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व सोपवले आहे. यजमान संघाला अलीकडेच झालेल्या कसोटी मालिकेत 0-3 फरकाने नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी थरंगाने 6 डावात केवळ 88 धावा जमवल्या. मात्र, झिम्बाब्वेविरुद्ध लंकेला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अँजिलो मॅथ्यूजही कर्णधारपदावरुन पायउतार झाल्याने येथे डावखुऱया थरंगावरच लंकेला नेतृत्वाची जबाबदारी सोपवावी लागली आहे. 

या आगामी वनडे मालिकेत मॅथ्यूज केवळ खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. शिवाय, अनुभवी जलद गोलंदाज लसिथ मलिंगा पुनरागमन करेल, ही यजमान संघाची एकमेव जमेची बाजू असेल. यापूर्वी, झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या मागील वनडे संघात लंकन व्यवस्थापनाने दोन बदल केले आहेत. मध्यमगती गोलंदाज नुवान प्रदीप व अष्टपैलू असेला गुणरत्ने दुखापतीमुळे बाहेर झाले असून त्यांची जागा युवा जलद गोलंदाज लहिरु कुमारा व डावखुरा फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमारा हे घेतील. अलीकडेच कसोटी मालिकेत या उभयतांचाही संघात समावेश होता.

वनडे मालिकेसाठी नेतृत्व सोपवल्या गेलेल्या थरंगाने प्रत्यक्ष मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच आपल्यासमोर कठीण आव्हान असेल, हे कबूल केले आहे. ‘प्रत्येक संघाला खराब फॉर्ममधून जावे लागते. कोणताही संघ कितीही दिग्गज असला तरी यातून त्यांची सुटका असत नाही. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे आमचे प्रयत्न असतील आणि यासाठी देशवासियांचे पाठबळ आम्हाला अपेक्षित आहे’, असे तो याप्रसंगी म्हणाला. ‘2 कोटी लोकसंख्येच्या आमच्या देशरुपी कुटुंबाला पतप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीच आम्ही मैदानात उतरु’, याचा त्याने उल्लेख केला.

लंकन संघाने यापूर्वी भारताविरुद्ध भारतीय भूमीत नोव्हेंबर 2014-15 मध्ये शेवटची वनडे मालिका खेळली. त्यात भारताने लंकेचा 5-0 असा एकतर्फी फडशा पाडला. त्यानंतर अलीकडेच चॅम्पियन्स चषकात मात्र लंकेने ओव्हलवर भारताला पराभवाचा जबरदस्त धक्का दिला होता. त्याची परतफेड करण्याचा आता विराट व कंपनीचा इरादा असणार आहे.

वनडे मालिकेसाठी लंकन संघ : उपूल थरंगा (कर्णधार), अँजिलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, दनुष्का गुणथिलका, कुशल मेंडिस, चमरा कपुगेदरा, मिलिंदा सिरिवर्दना, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्शन संदकन, थिसारा परेरा, वनिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चमीरा, विश्वा फर्नांडो.

अश्विन-जडेजाच्या गैरहजेरीत चायनामन कुलदीपकडून भरीव अपेक्षा

सध्या रोटेशन पॉलिसीनुसार विविध खेळाडूंचे पर्याय आजमावून पाहणाऱया भारतीय संघव्यवस्थापनाने युवा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवकडून दीर्घ कालावधीत भरीव अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्यासारखे दिग्गज फिरकीपटू इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये सहभागी होत असताना इथे कुलदीप यादववर भारतीय फिरकी आघाडीची प्रामुख्याने भिस्त असेल, यावरुनही त्याला दिलेली संधी किती महत्त्वाची, हे अधोरेखित होते. आगामी 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी कुलदीप व्यवस्थापनाच्या पसंती क्रमात आहे, हे देखील स्पष्ट आहे.

कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी उत्तर प्रदेशच्या या युवा गोलंदाजाबाबत आपण महत्त्वाकांक्षी असल्याचे यापूर्वीच नमूद केले आहे. ‘सध्याच्या मालिकांसाठी खेळाडूंत रोटेशन करत असतानाच 2019 विश्वचषकासाठी संघाची जडणघडण होणे अर्थातच महत्त्वाचे आहे. आपला संघ वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढणार असल्याने त्यासाठी वेगळी संघबांधणी करावी लागेल. शिवाय, विश्वचषकही नजरेसमोर ठेवावा लागेल. मात्र केवळ मर्यादित षटकांपुरते मर्यादित न राहता कसोटी क्रिकेटमधील आव्हानांचा विचार करावा लागेल’, असे एमएसके प्रसाद प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

‘2018 मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांचे 3 खडतर आव्हाने भारतीय संघासमोर असतील, तेथे आपल्या आघाडीच्या गोलंदाजांना सध्याचा कौंटी क्रिकेटमधील अनुभव उपयुक्त ठरेल’, याचाही त्यांनी उल्लेख केला. ‘चायनामन कुलदीपला कठोर मेहनतीच्या बळावर फॉर्ममध्ये सातत्य राखताना तंदुरुस्तीचा दर्जाही उत्तम राखावा लागेल’, हे कर्णधार विराट कोहलीने यावेळी स्पष्ट केले.

 

मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेची रुपरेषा

तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

दि. 20 ऑगस्ट / पहिली वनडे / दुपारी 2.30 वा. / डम्बुला

दि. 24 ऑगस्ट / दुसरी वनडे / दुपारी 2.30 वा. / पल्लेकेले

दि. 27 ऑगस्ट / तिसरी वनडे / दुपारी 2.30 वा. / पल्लेकेले

दि. 31 ऑगस्ट / चौथी वनडे / दुपारी 2.30 वा. / कोलंबो

दि. 3 सप्टेंबर / पाचवी वनडे / दुपारी 2.30 वा. / कोलंबो

दि. 6 सप्टेंबर / एकमेव टी-20 / सायं. 7 वा. / कोलंबो

Related posts: