|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत

पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत 

प्रतिनिधी/ पणजी

यवर्षी सरासरीपेक्षा 26 इंच पाऊस कमी पडला आहे. आगामी 24 तासात गोव्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असली तरी गेल्या 15 दिवसात पावसाने पाठ फिरवली असल्याने फळभाज्या तसेच भातशेती अडचणीत आली आहे. त्याचबरोबर ताप व सर्दीमुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत.

आजपर्यंत पणजीत 61 इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे. एव्हाना 86 इंच पेक्षाही जादा पाऊस होत असतो, परंतु जुलैमध्ये पावसाने दडी मारली व अखेरीस थोडा फार पाऊस झाला. ऑगस्ट आता निम्मा झालेला असला तरी पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. यामुळे तापमान वाढलेले आहे. शिवाय राज्यातील भातशेती अडचणीत आली आहे. भेंडी, काकडी, भोपळा, कोहळा, दोडकी इत्यादी उत्पादन घटले आहे. शेतकरीवर्ग अडचणीत आलेला आहे. सुपारी उत्पादनावर विपरित परिणाम झालेला नाही, मात्र चार दिवसात पाऊस पडला पाहिजे. तेवढा पाऊस पडलेला नाहीच. उलटपक्षी कडक ऊन पडत असल्याने बागायती उत्पादनांवर पुढील काळात परिणाम होण्याची शक्यता आहे.

पणजी वेधशाळेत आजपर्यंत यंदाच्या मोसमातील पावसाची नोंद 60.77 म्हणजेच जवळपास 61 इंच इतकी झाली आहे. एव्हाना 86 इंच पाऊस पडणे गरजेचे होते. राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झालेला आहे.

वाळपईत पावसाची शंभरी

वाळपईत सर्वाधिक 100 इंच पावसाची आतापर्यंत नोंद झालेली आहे. एव्हाना साधारणतः 150 इंचापर्यंत पाऊस पडून जातो, परंतु गेल्या 3 वर्षात सत्तरीतील पावसाचे प्रमाण कमी होत आहे. सह्याद्री घाटातील मुसळधार पाऊस गेले 15 ते 20 दिवस गायब असून पर्यावरणासाठी ही एक गंभीर बाब बनलेली आहे. वाळपईमध्ये काही वर्षांपूर्वी 170 ते 210 इंच एवढी पावसाची विक्रमी नोंद व्हायची. आज हे प्रमाण निम्म्यावर येऊन ठेपले आहे. सांगेमध्ये या काळात 110 इंच पावसाची नोंद होत असे. यावर्षी केवळ 86 इंच पाऊस पडल्याची नोंद आहे. ऐन श्रावणात पावसाने पाठ फिरवल्याने सर्वसामान्य नागरिकही काळजीत पडले आहेत.