|Saturday, March 23, 2019
You are here: Home » क्रिडा » यू-19 विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

यू-19 विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर 

वृत्तसंस्था /दुबई :

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱया 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले असून तीन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या भारताची सलामीची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ही स्पर्धा 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 या कालावधीत होणार आहे.

भारत व ऑस्ट्रेलिया यांचा ब गटात समावेश करण्यात आला असून याच गटात झिम्बाब्वे व पूर्व आशिया पॅसिफिक पात्रतेतून आलेल्या पापुआ न्यू गीनिया यांचाही समावेश आहे. विद्यमान विजेत्या वेस्ट इंडीजची सलामीची लढत यजमान न्यूझीलंडशी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. गट अ मधील ही डे-नाईट लढत बे ओव्हलवर होणार आहे. या स्पर्धेत सोळा संघांचा सहभाग असून यातील सामने ख्राईस्टचर्च, क्वीन्सटाऊन, टॉरंगा, व्हान्गारेइ येथील सात केंद्रांवर खेळविले जाणार आहेत. 2012 मध्ये जेतेपद मिळविलेला दक्षिण आफ्रिका व आफ्रिका विभागातून पात्र ठरलेला केनिया या संघांचाही अ गटात समावेश आहे.

अफगाणिस्तान व आयर्लंड या देशांना अलीकडेच कसोटी दर्जा मिळाला आहे. त्याआधीच्या कसोटी खेळणाऱया दहा संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळालेला आहे. याशिवाय मागील स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱया संलग्न देशांपैकी नामिबियालाही यावेळी थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचप्रमाणे पाच विभागातून पात्र ठरलेल्या संघांनाही दर दोन वर्षांनी होणाऱया या स्पर्धेत स्थान मिळाले आहे. बांगलादेश, कॅनडा, इंग्लं, नामिबिया यांचा गट क मध्ये, दोनवेळा जेतेपद मिळविलेल्या पाकिस्तान, लंका, अफगाणिस्तान, आयर्लंड यांचा गट ड मध्ये समावेश झाला आहे.  यू-19 विश्वचषक स्पर्धेची ही 11 वी आवृत्ती असून न्यूझीलंडमध्ये तिसऱयांदा ही स्पर्धा भरविली जात आहे.

प्रत्येक गटात पहिले दोन स्थान मिळविणाऱया संघांना सुपरलीग फेरीत स्थान मिळेल तर उर्वरित आठ संघांत प्लेट चॅम्पियनशिपसाठी लढती होतील. उपांत्यपूर्व, उपांत्य व सुपरलीगमधील अंतिम लढतीसह एकूण 20 सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी जेतेपदाची लढत बे ओव्हल येथे तर दोन्ही उपांत्य सामने हॅगली ओव्हल, ख्राईस्टचर्च येथे 29 व 30 जानेवारी रोजी खेळविले जाणार आहेत. याचवेळी प्लेट चॅम्पियनशिपमधील सामनेही खेळविले जाणार असून यातील अंतिम लढत 28 जानेवारी रोजी बर्ट सटक्लिफ ओव्हल, ख्राईस्टचर्च येथे खेळविली जाईल.

नवोदित संघांना स्पर्धेची प्रतीक्षा

पात्रता फेरीतून आलेल्या संघांचे कर्णधार या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असून सर्व खेळाडू व पंच, पदाधिकारी यांच्यासाठी विकासाचे हे पहिले पाऊल ठरणार आहे. अफगाणचा कर्णधार नवीन उल हक म्हणाला की, ‘क्रिकेट खेळणाऱया कोणत्याही देशाचे जे ध्येय असते तेच आमचेही स्वप्न आहे. सकारात्मक खेळ करून विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविणे हेच आमचेही स्वप्न आहे.’ कॅनडाचा कर्णधार अब्राश खान म्हणाला की, ‘कोणत्याही बडय़ा संघाला चकित करण्याचे कौशल्य व क्षमता आमच्यात आहे, यावर आमचा विश्वास आहे. इतर संघांप्रमाणेच आम्हीही ही स्पर्धा जिंकण्याचे ध्येय बाळगले असून कॅनडा हा क्रिकेटमधील प्रगती करणारा नवोदित संघ असल्याचे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.’ आयर्लंड संघाचा कर्णधार हॅरी टेक्टरनेही अशाच भावना व्यक्त केल्या असून या स्पर्धेत खेळण्यास मिळणार असल्याने आपले खेळाडू खुश झाले आहेत. आपली गुणवत्ता दाखवून आम्ही सर्वचजण उत्सुक झालो आहोत, असे तो म्हणाला.

Related posts: