|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रेल्वे प्रवाशांच्या दिमतीला विशेष कृतीदल!

रेल्वे प्रवाशांच्या दिमतीला विशेष कृतीदल! 

प्रत्येक रेल्वेत कृतीदल तैनात,

वाढत्या चोऱयांना बसणार आळा,

प्रवाशांनी टाकला सुटकेचा निःश्वास

राजू चव्हाण /खेड

गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया गाडय़ांमध्ये उसळणाऱया गर्दीच्या पार्श्वभुमीवर गणेशभक्तांच्या दिमतीला रेल्वे सुरक्षा दल तैनात राहणार आहे. त्याचबरोबर आता वाढत्या चोऱया व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष कृतीदलही प्रवाशांच्या दिमतीला तैनात राहणार आहे. त्यामुळे यंदा गणेश भक्तांना प्रवास सुरक्षित व सुखदायक होणार आहे.

कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱया चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे जादा व विशेष गाडय़ांच्या माध्यमातून प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र, प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उदेक होवून अनुचित प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर यंदाही कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील.

गेल्या काही महिन्यांपासून कोकण मार्गावर चोऱयांचे प्रमाण खूपच वाढले आहे. विशेषतः खेड, चिपळूण, वीर, माणगांव, कोलाड, करंजाडी आदी स्थानकांमध्ये चोऱयांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास याठिकाणी रेल्वेगाडय़ा क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर महिलांचे मंगळसूत्र व पर्स चोरीच्या प्रकाराने अक्षरशः उच्छादच मांडला आहे. दिवसाढवळय़ाही महिलांचे दागिने व पर्स लंपास होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यात माणगांव ते खेड या स्थानकांदरम्यान 5 विवाहित महिलांचे दागिने चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. कोकण रेल्वे मार्गावरील वाढत्या चोऱयांमुळे प्रवाशांमध्ये नेहमीच असुरक्षीततेची भावना असते. यापार्श्वभुमीवर रेल्वेतील चोऱया रोखण्यासाठी विशेष कृतीदलाची फौज रेल्वेगाडय़ांमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत सर्वच रेल्वेगाडय़ांना प्रवाशांची अलोट गर्दी उसळत असते. याचाच गैरफायदा चोरटे घेतात. मात्र यावेळी विशेष कृतीदलाची करडी नजर असणार आहे. केवळ गणेशोत्सव कालावधीपुरती ही मोहीम न राबवता यापुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र करून वाढत्या चोऱयांना लगाम घालण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहे. प्रत्येक रेल्वेमध्ये विशेष कृतीदल तैनात करण्यात येणार असून वाढत्या चोऱया लक्षात घेऊन ही मोहीम अधिक गतिमान करण्याचे आदेशही बजावण्यात आले आहे.

51 अनधिकृत फेरीवाले कारवाईच्या कचाटय़ात!

वाढत्या चोऱयांना लगाम घालण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या विशेष कृतीदलाने कोकण रेल्वेतील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. सहा दिवसात 51 अनधिकृत फेरीवाले कचाटय़ात अडकले. त्यांच्याकडून 21 हजार 300 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अवनीशकुमार, उपनिरीक्षक दीपक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने राबवली. या कारवाईमुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related posts: