|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सार्वजनिक बांधकामकडे आता कंत्राटदारांचे दोनच प्रकार

सार्वजनिक बांधकामकडे आता कंत्राटदारांचे दोनच प्रकार 

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागात आता दिड कोटी रकमेपेक्षा जास्त रकमेच्या कामासाठी नोंदणीकृत कंत्राटदाराची आवश्यकता नसल्याने दिड कोटीवरील कामांसाठीची नोंदणीकृत पद्धत संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आता दिड कोटींपर्यंतच्या कामांसाठीचे नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे दोनच प्रकार यापुढे अस्तित्वात असणार आहेत. 21 ऑगस्टनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व ‘वर्गांची’ कंत्राटदार नोंदणी संपुष्टात येणार आहे. तसेच ज्यांची वैधता त्यानंतर संपत आहे, त्या नोंदणीकृत कंत्राटदारांची नोंदणी आपोआपच व्यपगत होणार आहे.

शासनाने नव्याने जाहीर केलेल्या धोरणानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातील नोंदणी इतर विभागातही ग्राहय़ असल्याने संबंधित विभागास त्यांच्याकडे कंत्राटदार नोंदणी प्रक्रिया 21 ऑगस्ट 2017 पर्यंत कार्यान्वित ठेवायची आहे. सद्यस्थितीत कंत्राटदारांची नेंदणी ऑनलाईन असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध जिल्हा नोंदणी समितीकडे 21 ऑगस्टपर्यंत प्राप्त कंत्राटदार नोंदणी प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

या आदेशानुसार 21 ऑगस्ट 2017 नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व (वर्ग 3, 2, 1 क, 1 ब व 1 अ) वर्गाची कंत्राटदारांची नोंदणी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदारांचे दिड कोटीपर्यंतचे नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे दोनच प्रकार अस्तित्वात असणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, सद्यस्थितीत वर्ग तीन म्हणजे तीन कोटीपर्यंत, वर्ग 2 म्हणजे तीन ते साडेसात कोटी, 1 क म्हणजे साडेसात ते 15 कोटी, 1 ब म्हणजे 15 ते 25 कोटी व 1 अ म्हणजे 25 कोटी किंवा त्यावरील असे नोंदणीचे प्रकार होते. हे सर्व प्रकार 21 ऑगस्टनंतर संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर दिड कोटीपर्यंतचे नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे दोनच प्रकार अस्तित्वात असणार आहेत.

शासनाच्या धोरणानुसार दिड कोटीपर्यंतच्या कामांसाठी नोंदणीकृत कंत्राटदार असणे अनिवार्य असल्याने दिड कोटींचा एकच कंत्राटदारवर्ग यापुढे अस्तित्वात असणार आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी कंत्राटदारांचे सॉलव्हन्सी प्रमाणपत्र, मागील तीन वर्षात पूर्ण केलेली कामे, सुरू असलेली कामे, इतर आवश्यक कागदपत्रे म्हणजे इन्कम टॅक्स, जीएसटी आदी माहिती ऑनलाईन फी भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया होऊन हे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

या धोरणानुसार 21 ऑगस्टनंतर वर्ग 3, 2, 1 क, 1 ब व 1 अ ची नोंदणी प्रक्रिया संपुष्टात येत असली, तरीही वर्ग 4, 5, 6, 7 असे कंत्राटदार नोंदणीवर्ग अस्तित्वात आहेत. मात्र, याबाबतही धोरण निश्चित करण्यात आले असून या धोरणानुसार आज वैध असलेले सर्व वर्गातील नोंदणी प्रमाणपत्र त्याच्या अंतिम वैध तारखेपर्यंत वैध असतील व त्यानंतर ते आपोआपच व्यपगत होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा प्रक्रियेअंतर्गत निविदा प्रसिद्ध करणे, लिफाफे उघडणे, निविदा तपासणी व स्वीकृती याबाबतच्या सूचना एप्रिल 2017 मध्ये निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची नियमपुस्तिका सहावी आवृत्ती व निविदाविषयक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्व शासन निर्णय, परिपत्रके अधिक्रमित करण्यात आली आहेत. 21 ऑगस्टनंतर ही सर्व प्रक्रिया अंमलबजावणी होणार असल्याने यापुढे नवीन आदेशानुसारच कंत्राटदार नेंदणी अस्तित्वात असणार आहे.

Related posts: