|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मंत्री, नेतेमंडळींची दांडी अन् कार्यकर्त्यांचीही पाठ

मंत्री, नेतेमंडळींची दांडी अन् कार्यकर्त्यांचीही पाठ 

चिपळुणातील भाजपच्या संकल्प ते सिध्दी कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, हिरमुसलेले चेहरे

 

प्रतिनिधी /चिपळूण

केंद्र सरकारच्या संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी येथील स्व. बाळासाहेब माटे सभागृहात झाला खरा, पण सत्ताधारी भाजपाच्या निमंत्रण पत्रिकेवरील एकही नेता अथवा मंत्री न फिरकल्याने आणि त्यातच स्थानिक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. यातच अडीच तास रिकाम्या खुर्च्या पाहून कंटाळलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारत जोडो अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री गीते यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प ते सिध्दी कार्यक्रम देशभर राबवण्याच्या सूचना केल्यानंतर जिह्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री गीते यांच्याकडे दिली. त्यानुसार सोमवारी भाजपच्यावतीने येथे आयोजित कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ठ्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्त्रबुध्दे, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, कोकण संघटक मंत्री सतीश धोंड आदी उपस्थित रहाणार होते. मात्र यातील एकही नेता यावेळी उपस्थित राहिला नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार रमेश कदम यांनीही या कार्यक्रमाला ‘दांडी’ मारली. दरम्यान सकाळी 10 वाजता आयोजित केलेला कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजायला आले तरीही सभागृहात कार्यकर्त्यांचा पत्ता नसल्याने अखेर गीते यांनी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना केल्या. अखेर जेमतेम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच संकल्प ते सिध्दीचा शुभारंभ करण्यात आला.

शिवसेनेनेही फिरवली पाठ

दरम्यान, केंद्र सरकारचा कार्यक्रम असल्याने आणि सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून गीतेंबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, पंचायत समितीतील गटनेते राकेश शिंदे, नगर परिषदेतील शशिकांत मोदी, राजू भागवत, उपसभापती शिगवण सोडल्यास कोणीच उपस्थित नव्हते. कार्यक्रमाचा बट्टय़ाबोळ उडाल्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी मात्र सेनेवर राग काढला आहे. सत्तेत असताना आणि केंद्राचा कार्यक्रम असताना कार्यक्रमाकडे पाठ का? असा सवाल कार्यक्रमानंतर काही पदाधिकाऱयांनी केला आहे.

मोदींच्या भारत जोडो अभियानात सहभागी व्हा ः गीते

स्वातंत्र्यापूर्वीच्या अगोदरच्या टप्प्यात 9 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजाना चले जावचा इशारा देत सळो की पळो करून सोडले तो दिवस आज क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या आंदोलनाला आता 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 ऑगस्ट 2017 ते 2022पर्यत संकल्प ते सिध्दी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. आपला देश विविध राज्यांनी जोडलेला आहे. प्रत्येकाचे प्रश्न आणि समस्या वेगळय़ा आहेत. दहशतवाद, माओवाद, नक्षलवाद फोफावत असतानाच आता जातीयवादाचीही भर पडत चालली आहे. देशातील हे सर्व वाद बाजूला करून अखंड भारत जोडण्यासाठी मोदीनी सुरू केलेल्या भारत जोडो अभियानात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गीते यानी केले.

या कार्यक्रमाला भाजपचे बाळ माने, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. विलास पाटणे, माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे, निलम गोंधळी, रश्मी कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजणे, पंचायत समितीचे उपसभापती शरद शिगवण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत शिरगांवकर यानी केले.