|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणेशोत्सवात कोकण रेल्वे सुरक्षेसाठी 100 जवान तैनात

गणेशोत्सवात कोकण रेल्वे सुरक्षेसाठी 100 जवान तैनात 

रेल्वे सुरक्षा बल सहाय्यक आयुक्त अमितकुमार शर्मा यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

रेल्वे सुरक्षा बल जवान गणेशोत्सवासाठी सज्ज झाले असून केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या 100 जवानांची टीम रत्नागिरीत बंदोबस्तासाठी दाखल झाली आहे. कोकण रेल्वेने हजारो चाकरमानी या हंगामात प्रवास करतात. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे सुरक्षा बलने योग्य नियोजन केले असल्याची माहिती सहाय्यक सुरक्षा आयुक्त अमितकुमार शर्मा यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

गणेशोत्सवाच्या हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी योग्य नियोजन केले असून 100 जवानही दाखल झाले आहेत. ज्या रेल्वेत अधिक गर्दी असेल, त्यात जवानांचा बंदोबस्त अधिक असणार आहे. तसेच जिल्हय़ातील प्रत्येक रेल्वेस्टेशनवर जवान तैनात असणार आहेत. यासाठी मंगळवारी येथील मुख्य रेल्वे स्थानकात एक बैठकही संपन्न झाली. यावेळी सहाय्यक सुरक्षा आयुक्त के. वसंतकुमार, अमितकुमार शर्मा, पोलीस निरीक्षक अमित मदाले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सिंग आदी अधिकारी वर्गांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अमितकुमार शर्मा यांनी जवानांना योग्य सूचना, मार्गदर्शन केले आहे.

रेल्वेत अथवा प्लॅटफॉर्मवर काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित त्यावर कार्यवाही करण्यात यावी. 24 तास जवानांनी अलर्ट रहावे, असे आवाहनही त्यांनी या बैठकीनंतर मार्गदर्शन करताना केले. मुळात रेल्वे सुरक्षा बल संख्या ही अपुरी असली तरी केंद्रीय सुरक्षा बल जवान दाखल झाल्याने बंदोबस्त सुरळीतपणे लावण्यास मदत झाली आहे. रेल्वे प्रवाशांनीही प्रवासात प्रसंगावधान राखावे. काही संशयास्पद वाटल्यास रेल्वे जवानांशी संपर्क साधावा जेणेकरून अनुचित घटनांना त्वरित आळा घालता येईल, असेही त्यांनी सांगितले.