|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बस पलटी होवून 24 प्रवाशी जखमी

बस पलटी होवून 24 प्रवाशी जखमी 

बस पलटी होवून 24 प्रवाशी जखमी

.प्रतिनिधी/ फलटण

फलटण तालुक्यातील राजाळे येथे एस. टी. पलटी होवून 24 तास होण्याच्या आतच मंगळवारी पुन्हा फलटण एस. टी. आगारातील साखरवाडी-जिंती-फलटण एस. टी. बस पलटी झाली. या दुर्घटनेत 24 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलग दुसऱया दिवशी बस अपघात झाल्यामुळे प्रवाशीवर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तसेच फलटण आगाराच्या कारभारावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

            साखरवाडी- जिंती- फलटण ही बस रेल्वे फाटक (पाटणेवाडी) नजीक पलटी होवून झालेल्या अपघातात 24 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून वाहक व चालकांनी तात्काळ बाहेर येवून एस. टी. च्या प्रवाशांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. दरम्यान, येथील स्थानिक नागरिकांनीही वाहक व चालकास मदत केली. जखमी प्रवाशांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. उपचार झाल्यानंतर यातील बरेच प्रवासी आपापल्या घरी निघून गेले. यातील वृद्ध महिला कांताबाई मनोहर इंगळे (वय 70) रा. मंगळवार पेठ, फलटण, लक्ष्मीबाई म्हस्को गोळे (वय 70 रा. जिंती ता. फलटण), विजया संदीप जाधव (वय 30 रा. जावली ता. फलटण) येथील महिला अद्यापही उपचार घेत आहेत.

            एस. टी. तील जखमी प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक स्वरूपाचे उपचार करून त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आल्याचे  वैद्यकीय अधिकाऱयाने सांगितले.

            लागोपाठ 2 दिवस एस. टी. पलटी होवून अपघात घडत असल्याने फलटण एस. टी. आगारातील बसेस वाहतुकीला योग्य नसल्याचा संशय नागरिक करू लागल्याने एस. टी. आगारप्रमुख यांनी एस. टी. बस वाहतुकीला योग्य असल्याचे पाहूनच एस. टी. बस वर्कशॉपच्या बाहेर सोडली असल्याची खात्री आगार प्रमुखांनी करणे आवश्यक आहे. अनेक गाडय़ा नादुरूस्त असल्याने त्या दुरूस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अपघात किरकोळ असला तरी एस. टी. पलटी होण्याचे कारण समजणे आवश्यक आहे. एस. टी. आगार प्रमुखाने एस. टी. आगरातून सुटणाऱया प्रत्येक एस. टी. बस चेक करणे आवश्यक आहे.