|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 67,748 घरगुती गणपती उद्या होणार विराजमान

67,748 घरगुती गणपती उद्या होणार विराजमान 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱया गणेशोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे 35  आणि 67 हजार 748 एवढे घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव शांततामय व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली असून पोलीस यंत्रणेने महामार्गावर मदत केंद्रे व फिरती पथके तैनात केली आहेत. आरोग्य यंत्रणेने रेल्वे व एसटी स्थानकावर वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मंडळीही मोठय़ा प्रमाणात आली आहेत. खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत.

   कोकणात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच तर जगाच्या कानाकोपऱयात कामानिमित्त गेलेले लोक गणेशोत्सवासाठी आवर्जून आपापल्या गावी येतात. त्याकरिता रेल्वे व एसटीच्या जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. गणपतीकडे आरास करण्यात गणेशभक्त मग्न झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही कार्यरत झाली आहे.

महामार्गावर पोलिसांची मदत केंद्रे

  चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महामार्गावर खारेपाटण ते बांद्यापर्यंत दहा ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच सात दुचाकी व चारचाकी वाहनांची फिरती पथके तैनात केली आहेत. अपघात घडल्यास तात्काळ मदत व्हावी व वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठीही पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 680 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. महामार्गावर अवजड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.

17 ठिकाणी आरोग्य पथके तैनात

  मुंबई तसेच जिल्हय़ाबाहेरून येणाऱया गणेशभक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी. तसेच आजारी असल्यास तात्काळ आरोग्य सेवा देऊन उपचार व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणेची रेल्वे व एसटी बसस्थानकावर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. अशी 17 पथके तैनात केली आहेत.

जिल्हय़ात 35 सार्वजनिक गणपती

   जिल्हय़ात घरगुती गणपती मोठय़ा प्रमाणात असतात. तरी देखील काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्गात असे 35 सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विराजमान होणार आहेत. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यात पाच, सावंतवाडी – आठ, वेंगुर्ले – तीन, कुडाळ – पाच, मालवण – तीन, कणकवली – सहा, देवगड – एक, वैभववाडी – चार याप्रमाणे सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत.

67 हजार 748 घरगुती गणपती

  25 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी घरोघरी सुरू आहे. रंगरंगोटी, लाईटींग, आरासाची तयारी जोरदार सुरू आहे. सिंधुदुर्गात तब्बल 67 हजार 748 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. त्यात दोडामार्ग पोलीस ठाणे अंतर्गत 4 हजार 827 गणपती, बांदा पोलीस ठाणे अंतर्गत 2 हजार 577 गणपती, वेंगुर्ले अंतर्गत 4 हजार 955, कुडाळ अंतर्गत 8 हजार 635, सावंतवाडी अंतर्गत 9 हजार 704, निवती अंतर्गत 3 हजार 269, सिंधुदुर्गनगरी अंतर्गत 2 हजार 285, मालवण अंतर्गत 4 हजार 686, आचरा अंतर्गत 2 हजार 420, कणकवली अंतर्गत 9 हजार 117, देवगड अंतर्गत 6 हजार 679, विजयदुर्ग अंतर्गत 3 हजार 263, वैभववाडी अंतर्गत 5 हजार 330 गणपती याप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत मिळून 67 हजार 748 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.