|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » युसी ब्राऊझरवर बंदीची शक्यता?

युसी ब्राऊझरवर बंदीची शक्यता? 

चीनमध्ये डेटा पाठवित असल्याचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

युसी ब्राऊझर केंद्र सरकारच्या देखरेखीखाली आला आहे. या ब्राऊझरमधून भारतीय स्मार्टफोन वापरकर्त्यांची खासगी माहिती चीनमधील सर्व्हरमध्ये पाठविण्यात येत आहे. या प्रकरणी सरकारकडून तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास ब्राऊझरवर बंदी घालण्यात येईल असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

भारतीय वापरकर्त्यांची माहिती चीनमधील सर्व्हरमध्ये पाठविण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. वापरकर्त्यांने स्मार्टफोनमधून ब्राऊझर अनइन्स्टॉल केल्यावर अथवा ब्राऊझिंग डेटा स्वच्छ केल्यानंतरही वापरकर्त्याच्या फोनचे नियंत्रण चीनमधील सर्व्हरकडे असते असे मंत्रालयातील अधिकाऱयाने सांगितले. युसी ब्राऊझरची पालक कंपनी युसी वेबने या प्रकरणी सरकारकडून कोणतीही तक्रार अथवा नोटीस न मिळाल्याचे म्हटले आहे.

प्रत्येक प्रांतात स्थानिक नियमांनुसार ग्राहकांची खासगी माहिती आणि सुरक्षेचे गंभीरपणे पालन करण्यात येते. ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी आयटी कंपन्या विविध देशांमध्ये सर्व्हर उभारतात ही सामान्य बाब आहे. डेटा इन्क्रिप्ट होता नये यासाठी कडक पावले उचलण्यात येतात, असे चिनी कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षी भारत आणि इंडोनेशियामध्ये महिन्यामध्ये 100 दशलक्ष सक्रीय वापरकर्ते असल्याचा दावा केला होता. जून 2017 च्या आकडेवारीनुसार, युसी ब्राऊझर देशातील सर्वाधिक वापरण्यात येणारा दुसरा ब्राऊझर असून पहिल्या स्थानी गुगलचा क्रोम आहे.