|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आला आला विघ्नहर्ता गणराया!

आला आला विघ्नहर्ता गणराया! 

प्रतिनिधी/ पणजी

उद्या शुक्रवार दि. 25 ऑगस्टपासून राज्यात गणेशचतुर्थी उत्सव सुरु होत असून त्यासाठी घरोघरी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. ते विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. गोव्यातील चतुर्थी उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार असून घरगुती गणेशोत्सव प्रामुख्याने दीड दिवस, पाच, सात, नऊ दिवसांचा असतो. सार्वजनिक मंडळाचे गणेशोत्सव अकरा दिवस चालतात.

गणेशाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी रंगरंगोटी सजावट, आरास तसेच मखर करण्यात आली असून सार्वजनिक मंडळाची देखील लगबग सुरु आहे. बाजारपेठेत वाहनांची, लोकांची मोठी गर्दी होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. फळे, फुले, हार, सजावट साहित्याने बाजारपेठा झगमगत असून महागाई असली तरी खरेदीसाठी गर्दीची लाट उसळली आहे. शाळा-कॉलेज यांना सुमारे आठवडाभराची सुटी सुरु झाली असून शहरातील बहुतेक लोक आपापल्या मूळ गावी चतुर्थीसाठी रवाना झाले आहेत. नोकरी-धंदा-व्यवसायानिमित्ताने गोव्याबाहेर असलेली मंडळी गोव्यात परतली असून गणेशाचे आगमन होणार असल्याने सर्व अबाल-वृद्ध मंडळी आनंदीत दिसत आहेत.

चतुर्थी काळात गोव्यात मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होते. त्यांची खास दुकाने बाजारपेठेत लागली असून त्यांची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात चालू आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध प्रकारची नाटके, संगीत कार्यक्रम व इतर मनोरंजन जनतेसाठी उपलब्ध असून ते पाहण्यास मोठी गर्दी होते. चतुर्थीनिमित्त आता भजने, घुमट आरत्या व विविध गायन कार्यक्रम सुरु होणार असून ते अकरा दिवस चालणार आहेत. गणेशाच्या आगमनानंतर दीड दिवसांनी गणरायाला निरोप देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

Related posts: