|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संकटांच्या गर्तेत भारतीय हत्ती

संकटांच्या गर्तेत भारतीय हत्ती 

सस्तन प्राण्यांमध्ये सगळय़ात मोठा मेंदू असलेल्या आणि त्यामुळे बुद्धिमान गणल्या जाणाऱया हत्तीला भारतीय धर्म-संस्कृतीने आदराचे स्थान शेकडो वर्षांपासून प्रदान केलेले आहे. गजमुखी दैवत असणाऱया गणपतीच्या नावाने भाद्रपदातल्या चतुर्थीला साजरा होणाऱया उत्सवाप्रसंगी भारतीय लोकमानसात असलेली प्रेम आणि भक्ती प्रकर्षाने अभिव्यक्त होते. सांगेतल्या रिवण-कोळंबच्या धांदोळे येथील फणसाय मळावर कुशावती नदीच्या उजव्या तिरावरती असलेल्या मध्याश्मयुगाशी नाते सांगणाऱया प्रस्तर चित्रांच्या दालनात हत्तींच्या पूर्वजांचे दर्शन घडते. तामिळनाडूपासून भारताच्या विविध भागातल्या शिल्पकलेत हत्ती दृष्टीस पडतो. औरंगाबादजवळील अजिंठाच्या भित्तीचित्रातला गुलाबी हत्ती इथल्या लोकमानसात असलेल्या हत्तीच्या स्थानाची प्रचिती आणून देतो. केरळ, कर्नाटकसारख्या राज्यातल्या राज्यस्तरीय उत्सवात हत्तींना प्राचीन काळापासून आदर, सन्मान दिला जायचा परंतु असे असले तरी आज भारतीय उपखंडातल्या जंगलात प्रामुख्याने वावर असलेला हत्ती नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. या संदर्भात सरकार आणि समाज यांनी गांभीर्याने विचारविनिमय करून प्रत्यक्ष उपाययोजना आखली नाही तर ही परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे.

जगातले 2.61 टक्के भौगोलिक क्षेत्रफळ असलेल्या आपल्या देशात 17 टक्के लोकसंख्येचे वास्तव्य आहे. असे असले तरी जगातले 60 टक्के आशियाई हत्ती, 65 टक्के वाघ, 100 टक्के आशियाई सिंह आणि 85 टक्के एकशिंगी गेंडय़ांचे वास्तव्य भारतीय जंगलात आहे. एकेकाळी मानव आणि वन्यजीव यांच्यात सौहार्दाचे स्नेहबंध असल्याने इथले हत्ती, पट्टेरी वाघ, आशियाई सिंह आणि एकशिंगी गेंडे गुण्यागोविंदाने नांदत होते परंतु आज महामार्ग, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग, धरणे, कालवे आणि विकासाचे नाव धारण करून येणाऱया महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हत्तीचा नैसर्गिक अधिवास असणारी जंगले दिवसेंदिवस विस्मृतीत जाऊ लागलेली आहेत आणि त्यामुळे देशभरातल्या हत्तींवर बेघर होण्याची पाळी आलेली आहे. झारखंडातल्या डोलमासारख्या प्रदेशात अन्न, पाण्यासाठी संघर्ष करणाऱया हत्तींनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवून भाताचा फडशा पाडण्याबरोबर त्यांनी मद्यपान करणे आरंभले आहे. राजाजी राष्ट्रीय उद्यानातून मार्गक्रमण करताना रेल्वे रूळावरती हत्तींच्या करुण मृत्यूच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. मधुमलाईच्या परिसरातल्या मनुष्यमात्रांचा हत्तींशी संघर्ष विकोपाला पोहोचलेला आहे. आसामातील बऱयाच अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारी राहणाऱया हत्ती आणि मानवी समाजाचे नाते टोकाला गेलेले आणि त्यामुळे विष प्रयोगाद्वारे हत्तींना जीवे मारण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 2012 सालातल्या हत्ती गणनेनुसार अंदाजे 30 हजार हत्ती भारतात आहेत. गेल्या साठ वर्षांच्या कालखंडात आशियाई हत्तींची भारतातली संख्या पूर्वीच्या तुलनेत अर्ध्यावरती आलेली आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

कर्नाटकातल्या दांडेलीचे सधन जंगल एकेकाळी हत्तीच्या नैसर्गिक अधिवासासाठी प्रसिद्ध होते परंतु कागद कारखान्यासाठी आणि खनिज उत्खननासाठी जेव्हा हिरव्यागार जंगलांचे आच्छादन उद्ध्वस्त करण्यात आले तेव्हा 2001 पासून या हत्तींनी आपला मोर्चा म्हादई आणि तिराळी/कोलवाळ खोऱयाकडे वळवला. 2001 साली गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरच्या मान गावातल्या गंगी बाबू बोडके या छोटय़ा मुलाचा पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेला असता हत्तीने बळी घेतला होता. त्यानंतर हत्तींनी दोडामार्ग तालुक्यातल्या मांगेलीत बराच काळ तळ ठोकून तेथील शेती, बागायतींचा विध्वंस मांडला. केर, मोर्ले येथे तर टस्कर हत्तीने अक्षरशः धुमाकूळ माजवला. 2002 साली महाराष्ट्र-कर्नाटकाने संयुक्तरित्या ‘एलिफंट बॅक टू होम’ या अविवेकी आणि आततायी योजनेची चर्चा करून नोव्हेंबर 2004 मध्ये ती प्रत्यक्ष अमलात आणली. हत्तींचा फुटबॉल त्यानंतर बराच काळ महाराष्ट्र-कर्नाटकात रंगला. प्रारंभी मांगेली, बोडदे त्याचप्रमाणे तिळारी खोऱयातल्या बऱयाच गावातल्या शेतकरी, बागायतदारांचे हत्तींनी नुकसान केले. गोव्यातल्या साळ, पीर्ण, रेवोडा, लाटंबार्से, इब्रामपूर, हणखणेसारख्या गावात हत्तींनी मनुष्यबळाबरोबर मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले होते.

गोवा वन खात्याचे वन परिक्षेत्राधिकारी परेश परोब आणि प्रकाश सालेलकर यांनी वन्यजीव विभागाचे संचालक सी. डी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली इब्रामपूर येथे यशस्वीरित्या हत्तींची पाठवणी करण्यासाठी मोहीम राबवली. त्यानंतर गोव्यातून हुसकावून लावलेले हत्ती सध्या तिलारी खोऱयातल्या हेवाळेत शेतकऱयांच्या नुकसानीला कारणीभूत ठरलेले आहे. यापूर्वी विजेच्या धक्का तंत्राचा वापर करून महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हय़ातल्या चंदगडजवळच्या जेलगुंडेत तीन हत्तींचा बळी घेतला. कुडाळ, शिरंगे येथेही हत्तींचे मृत्यू उद्भवलेले आहेत. कर्नाटकातल्या हत्तींचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त झाल्याने हत्तींनी आपला मोर्चा म्हादई-तिळारी खोऱयातून माणगाव खोऱयातही वळवला आहे. हत्तीची निर्माण झालेली विस्थापनेची ही समस्या सोडविण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांनी एकत्रितपणे विचारविनिमय करून प्रत्यक्ष दूरगामी कृती आराखडा अमलात आणण्याची गरज होती. हिंदी चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम याने तर तिळारीचा जलाशय हत्तींसाठी राखीव क्षेत्र म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिसूचित करावा यासाठी आपण मोहीम हाती घेणार असल्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. हत्ती नसलेल्या महाराष्ट्रातल्या तिळारी, माणगाव खोऱयात सध्या गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून हत्तींनी आपले बस्तान मांडलेले आहे परंतु त्यांच्या वास्तव्याची  दखल घेत महाराष्ट्र सरकारने कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नसल्याने हत्तींची स्थिती दिवसेंदिवस प्रतिकूल झालेली आहे.

भारतीय वन्यजीव प्रतिष्ठान, हत्ती प्रकल्प आणि हत्तींसाठी काम करणाऱया बिगरसरकारी संस्थांनी देशभर सर्वेक्षण आणि अभ्यास करून हत्तींच्या पारंपरिक ये-जा करण्यासाठी असलेल्या 101 मार्गांचे नकाशे तयार केलेले आहे. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाचे नियोजन करण्यासाठी अभ्यास गट कार्यान्वित केलेला आहे. 12 ऑगस्ट रोजी हत्ती दिवस साजरा करताना देशभरातल्या हत्ती असलेल्या राज्यात गजयात्रेला झालेला प्रारंभ आणखी 15 महिने चालू राहणार आहे. गजमहोत्सवाचे आयोजन ठिकठिकाणी केले जाणार आहे. ख्रिस्तपूर्व 500 पासून मध्य-पूर्व आशियात वावर असलेल्या हत्तीच्या संरक्षणाचा विचार कौटिल्यांनी आपल्या अर्थशास्त्र ग्रंथात मांडलेला आहे. जातककथांनी तर हत्तींना अजरामर केलेले आहे परंतु असे असले तरी आज देशभर हत्तींच्या नैसर्गिक अधिवासांना कायमस्वरुपी संरक्षण देण्यासाठी, त्यांना मुबलक अन्न, पाणी मिळेल याची नियोजनबद्ध व्यवस्था करण्याच्या बाबतीत आपण अपयशी ठरलेलो आहोत.

Related posts: