|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दुसऱया वनडेत पावसाचा व्यत्यय, लंका 8 बाद 236

दुसऱया वनडेत पावसाचा व्यत्यय, लंका 8 बाद 236 

वृत्तसंस्था/ पल्लेकेले :

जसप्रीत बुमराह (4/43), यजुवेंद्र चहल (2/43) यांच्या चतुरस्त्र गोलंदाजीच्या बळावर भारताने येथील दुसऱया वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी यजमान श्रीलंकेला 50 षटकात 8 बाद 236 धावांवर रोखले. मधली फळी कोसळल्यानंतर मिलिंदा सिरिवर्दना (58) व अनुभवी चमरा कपुगेदरा (40) यांनी सहाव्या गडय़ासाठी साकारलेली 91 धावांची भागीदारी लक्षवेधी ठरली. लंकेचा डाव  झाल्यानंतर थोडय़ाच वेळात संततधार सुरु झाल्यामुळे भारताच्या डावाला निर्धारित वेळेत प्रारंभ होऊ शकला नव्हता.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लंकेतर्फे निरोशन डिकवेला (31) व दनुष्का गुणथिलका (19) यांनी जलद सुरुवात केली. भारताने यावेळी नवा चेंडू भुवनेश्वर कुमार (0/53) व जसप्रीत बुमराह (4/43) यांच्याकडे सोपवला होता. दोन्ही सलामीवीरांनी यावेळी आक्रमक पवित्र्यावर भर दिला होता. बुमराह आपल्या पहिल्या स्पेलमध्ये काहीसा महागडा ठरला. डिकवेलाने त्याच्या गोलंदाजीवर दोन उत्तुंग षटकारही चढवले. यामुळे, लंकेचे पहिले अर्धशतक नवव्या षटकातच फलकावर लागले. पण, बुमराहनेच डिकवेलाला शॉर्ट मिडविकेटवरील धवनकरवी झेलबाद करत हिशेब चुकता केला.

धोनीची संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी

कुशल मेंडिस (19) नंतर गुणथिलकाच्या साथीला उतरला आणि या जोडीने 29 धावांची भर घातली. पुढे यजुवेंद्र चहलच्या (2/43) डावातील 15 व्या षटकात गुणथिलकाला धोनीने यष्टीचीत केले. धोनीने वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाला यष्टीचीत करण्याची ही 99 वी वेळ ठरली. यासह त्याने कुमार संगकाराच्या विक्रमाशी देखील बरोबरी साधली.

कर्णधार उपूल थरंगाने (9) डावातील 16 व्या षटकात पंडय़ाच्या आऊटस्विंगरवर स्लीपमधील विराटकडे सोपा झेल दिला. मेंडिसही 24 व्या षटकात चहलला स्वीप करण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला आणि लंकेची 4 बाद 99 अशी पडझड झाली. अँजिलो मॅथ्यूजही (20) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर याच पद्धतीने पायचीत झाला. अक्षर पटेलने 10 षटकात 30 धावात 1 बळी, असे पृथक्करण नोंदवले. सिरिवर्दना व कपुगेदरा यांनी मात्र धावा जमवण्याची घाई करण्याऐवजी संयमी, निर्धाराने फलंदाजीवर भर दिला. अर्थात, त्यांनी खराब चेंडूवर फटकेबाजीची संधीही सोडली नाही.

पंडय़ा मैदानाबाहेर

28 व्या षटकात पंडय़ाला डाव्या खांद्याला वेदना होत असल्याने मैदान सोडावे लागल्यानंतर केदार जाधवने त्याचे षटक पूर्ण केले. यादरम्यान, सिरिवर्दना व कपुगेदरा जोडीने 63 चेंडूत 50 धावांची भागीदारी साकारत लंकेला 43 षटकात 200 धावांचा टप्पा सर करुन दिला. सिरिवर्दनाने 49 चेंडूत वनडेतील वैयक्तिक तिसरे अर्धशतक साजरे केले. नंतर तो 45 व्या षटकात बुमराहच्या स्लोअर वनवर कव्हरवरील रोहित शर्माकडे झेल देत बाद झाला. त्याने 58 चेंडूत 2 चौकार व एक षटकार वसूल केला. ही जोडी बाद होत असताना लंकेची नव्याने पडझड झाली. शेवटच्या पाच षटकात तर त्यांना जेमतेम 24 धावा जमवता आल्या. बुमराहने कपुगेदराचा त्रिफळा उडवत त्याची संघर्षपूर्ण खेळी संपुष्टात आणली. त्याने 61 चेंडूंचा सामना करत 2 चौकार वसूल केले.

धावफलक

श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. धवन, गो. बुमराह 31 (24 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), गुणथिलका यष्टीचीत धोनी, गो. चहल 19 (37 चेंडूत 2 चौकार), कुशल मेंडिस पायचीत गो. चहल 19 (48 चेंडूत 2 चौकार), उपूल थरंगा झे. विराट, गो. पंडय़ा 9 (7 चेंडूत 2 चौकार), अँजिलो मॅथ्यूज पायचीत गो. अक्षर पटेल 20 (41 चेंडूत 2 चौकार), सिरिवर्दना झे. शर्मा, गो. बुमराह 58 (58 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), कपुगेदरा त्रि. गो. बुमराह 40 (61 चेंडूत 2 चौकार), धनंजया झे. पटेल, गो. बुमराह 9 (11 चेंडूत 1 चौकार), चमीरा नाबाद 6 (7 चेंडू), फर्नांडो नाबाद 3 (6 चेंडू). अवांतर 22. एकूण 50 षटकात 8/236.

Related posts: