|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शोभिवंत मत्स्यपालन कृषीपूरक व्यवसाय!

शोभिवंत मत्स्यपालन कृषीपूरक व्यवसाय! 

कुडाळ :

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हा नाविन्यपूर्ण कृषीपूरक व्यवसाय असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी हा व्यवसाय एक आव्हान म्हणून स्वीकारून यशस्वी करावा आणि उद्योजक म्हणून समाजात स्थान प्राप्त करावे, असा सल्ला शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम सांगताप्रसंगी ल्युपिन हय़ुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशन (सिंधुदुर्ग) चे संचालक योगेश प्रभू यांनी दिला. यासाठी ल्युपिन फाऊंडेशन विद्यापीठासोबत एकत्र येऊन काम करेल. जास्तीत-जास्त व्यावसायिक उभे करण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) अंतर्गत शोभिवंत मत्स्यपालन प्रशिक्षण केंद्र, गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय (मुळदे) येथे शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन हा पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, मत्स्यवैज्ञानिक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नितीन सावंत, मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. मनोज घुघुसकर उपस्थित होते.

डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन हा व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहीत केले. ज्या-ज्यावेळी या केंद्राचे मार्गदर्शनपर सहकार्य आपणास आवश्यक असेल, तेव्हा ते विनाअट देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आयोजनाबद्दल मत्स्यप्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. नितीन सावंत, सूत्रसंचालन भालचंद्र नाईक, तर आभार डॉ. घुघुसकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक विनय सहस्त्रबुद्धे, कारासीन मेंडिस व सहकाऱयांनी व्यवस्थापन केले.

Related posts: