|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » टाकाऊ ‘रिळा’त साकारला इको-प्रेंडली मखर!

टाकाऊ ‘रिळा’त साकारला इको-प्रेंडली मखर! 

खेडच्या अभय पाटणेची लक्षवेधी कलाकुसर,

टाकाऊतून टिकाऊची निर्मिती,

कलाकृतीचे सर्वच स्तरातून होतेय कौतुक

राजू चव्हाण /खेड

बुद्धिची देवता असलेल्या गणपती बाप्पासाठी सगळेच जण आकर्षक विद्युत रोषणाई, आरास अन् लक्षवेधी मखर बनवत असतात. मात्र टाकाऊ वस्तूपासून मखराची निर्मिती करणारे मोजकेच आढळतील. बाजारपेठेतील बॉम्बे जनरल स्टोअर्सचे मालक व हरहुन्नरी कलाकार अभय मंगेश पाटणे यांनी चक्क 8 हजार टाकाऊ ‘रिळा’तून डोळय़ांचे पारणेच फेडणारी इको-प्रेंडली मखराची निर्मिती करत साऱयांचेच लक्ष वेधून घेतले. आहे. ही लक्षवेधी कलाकृती पाहण्यासाठी गर्दी उसळत असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतो. छंद ही मानवी मनाची नैसर्गिक क्रियाच असून तिची खऱया अर्थाने जपणूक करणाऱया कलाकारांनी नाव कमावले आहे. यामध्ये अभय पाटणे यांचेही अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच प्रत्येक गोष्टीत वेगळेपण शोधत टाकाऊ वस्तूला कलात्मकतेचा आकार देणाऱया अभय पाटणे यांनी आजवर नानाविध विषयांवर प्रबोधनात्मक मखरांच्या कलाकृती साकारत त्यातून अनमोल संदेश देण्याची परंपरा आजमितीसही कायम ठेवली आहे.

रिळ ही प्रत्येक टेलर्स दुकानात वापरतात. मात्र, रिळातील दोऱयाचा वापर केल्यानंतर हे रिळ टाकाऊ होतात. याच टाकाऊ रिळातून मखर साकारण्याची कल्पना अभय पाटणे यांना सूचली. यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून रिळ जमवण्यास सुरूवात केली. शहरातील स्टार ब्लाँस टेलर्सचे आंबुर्ले, टॉपमॅन टेलर्सचे महेंद्र घटे आदींनी रिळ जमवून दिले. 8 हजाराहून अधिक टाकाऊ रिळ गोळा करत टाकाऊपासून टिकाऊ अशा इको-प्रेंडली मखर साकारण्यासाठी त्यांना एक महिना मोजावा लागला.

त्यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा मखर साऱयांचेच लक्ष वेधून घेत आहे. या टाकाऊ रिळापासून टिकाऊ मखराची निर्मिती होईल, अशी कोणीच कल्पना करू शकत नाही. मात्र अभय पाटणे यांच्या कलाकुसरीतून साकारलेला हा मखर टाकाऊतून टिकाऊ वस्तूची निर्मिती कशी करता येते, याची साक्षच पटवतो. यापूर्वीही अभय पाटणे यांनी विविध विषयांवर प्रबोधनात्मक मखरे साकारताना पर्यावरण विषयकही अनोखे मूलमंत्र देत जनजागृती केली आहे.

यापूर्वी 10 किलो रद्दीपासून तयार केलेला मखर आजही प्रत्येकाच्याच स्मरणात आहे. गतवर्षी टाकाऊ बांगडय़ातून साकारलेला मखरही साऱयांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. हंपी येथील प्रसिद्ध दगडी रथाची प्रतिकृती, 6 फुटी दिपस्तंभ, अक्षरधाम आदी कलाकृती सरसच ठरल्या होत्या. आजवरच्या त्यांच्या प्रत्येक कलाकृतीने बक्षिसांची लयलूटच केली असून विविध वाहिन्यांच्या स्पर्धेत सहभाग नोंदवत पारितोषिकेही पटकावली आहेत.

Related posts: