|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हॉलिडे स्पेशलने कोकण रेल्वे मार्ग ‘ब्लॉक’!

हॉलिडे स्पेशलने कोकण रेल्वे मार्ग ‘ब्लॉक’! 

रेल्वेगाडय़ा 3 ते 4 तास उशिरानेच, गणेशभक्तांचे हाल

प्रतिनिधी /खेड

गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गणपती स्पेशल गाडय़ा सोडून चाकरमान्यांना दिलासा दिला असला तरी अतिरिक्त जादा गाडय़ांमुळे कोकण रेल्वेमार्ग पुरता ‘ब्लॉक’च झाला आहे. 3 ते 4 तास विलंबाने धावणाऱया रेल्वेगाडय़ांमुळे गणेशभक्तांचे हाल होत आहेत. विलंबाच्या प्रवासामुळे गणरायाच्या प्रतिष्ठापनेदरम्यान गाव गाठताना चाकरमान्यांना अक्षरशः तारेवरची कसरतच करावी लागली.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल 254 फेऱया चालवण्याचा निर्णय घेत गणेशभक्तांना सुखद धक्काच दिला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 25 फेऱयांची वाढ करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाडय़ांच्या 38 फेऱया धावत असून त्यात गणपती स्पेशल गाडय़ांची भर पडली आहे. कोकण रेल्वे मार्ग एकेरी असल्याने अतिरिक्त जादा गाडय़ांमुळे कोकण मार्गावर ताण निर्माण होवून हॉलिडे स्पेशल गाडय़ा ठिकठिकाणी क्रॉसिंगसाठी थांबवाव्या लागत आहेत. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले असून विलंबाच्या प्रवासाने गणेशभक्तांना मनस्तापालाच समोर जावे लागत आहे.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीयच होती. मात्र, शुक्रवारी कोकण रेल्वेगाडय़ा तब्बल 3 ते 4 तास विलंबानेच धावत होत्या. यामुळे गाव गाठायचे कसे? याचीच चिंता गणेशभक्तांना सतावत होती. मात्र, तरीही चाकरमानी रेल्वेगाडय़ांतूनच प्रवास करण्यास पसंती देत रखडत-रखडत गाव गाठले. यंदा गणेशोत्सवासाठी सर्वाधिक गणपती स्पेशल गाडय़ा सोडण्यात आल्या असून यामुळे कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावर सुरळीत प्रवासाचे नियोजन करताना रेल्वे प्रशासनाची दमछाक होत आहे.

त्यातच कोकण रेल्वेच्या मदतीला मध्य व पश्चिम रेल्वेही धावली असून यामुळे चाकरमान्यांना करावी लागणारी अडथळय़ांची शर्यत थांबली असली तरी विलंबाच्या प्रवासातून मात्र सुटका झालेली नाही. अतिरिक्त जादा गाडय़ांमुळे नियमित धावणाऱया गाडय़ा नियोजित वेळापत्रकानुसार धावतील, असा करण्यात आलेला दावाही फोल ठरला आहे. या नियमित गाडय़ाही उशिरानेच धावत आहेत. विलंबाच्या प्रवासामुळे चाकरमान्यांचा मनस्ताप थांबता थांबेनासा झाला असून यामुळे काही चाकरमान्यांनी खासगी वाहनानेच गाव गाठणे पसंत केले.

Related posts: