|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण

गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण 

माझा बाप्पा श्री…. गणेशोत्सवाचे वेध लागताच सगळीकडे गणपती बाप्पांची गीते ऐकायला मिळतात. दरवर्षी बाप्पाची नवनवीन गीते येतात. आपल्या जादुई आवाजाची मोहोर हिंदी-मराठी चित्रपटसफष्टीत उमटविणारे गायक शान ‘माझा बाप्पा श्री’ हा बाप्पाच्या गीताचा सोलो अल्बम रसिकांसाठी घेऊन आले आहेत. हे गीत नुकतेच प्रकाशित करण्यात आले. श्रीगणेशाचे गीत गाण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे धमाकेदार गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास शान यांनी व्यक्त केला.

गौरीहरा लंबोदरा नमो बुद्धीदाता…. शरण आलो चरणी तुझ्या टेकावया माथा…. शशांक कोंडविलकर यांच्या लेखणीने सजलेल्या या गीताला गणेश सुर्वे यांनी संगीतबद्ध केले आहे. गणपतीचं गीत जोशपूर्ण हवंच. या जोशासाठी गिरगावातील गिरगाव ध्वज पथक, गजर, कलेश्वरनाथ, जगदंब, राजमुद्रा, स्वस्तिक अशा सहा लोकप्रिय ढोल-ताशा पथकाने गीताला साथ दिली आहे. या गीतातून उत्सवाचे सर्व भाव प्रकट झाले आहेत. गीताचे छायांकन नितीन पाटील, पराग सावंत, प्रतीक वैती, प्रथमेश अवसरे, शुभम वळुंज यांनी केले असून स्टुडिओ छायांकनाची जबाबदारी विकास झा यांनी सांभाळली आहे. संकलन शशांक कोंडविलकर, प्रशांत कोंडविलकर, मिलिंद हेबळे यांचे आहे. लाईव्ह रिदमची जबाबदारी रत्नदीप जामसांडेकर, शशांक हडकर, आदित्य सालोस्कर यांनी सांभाळली आहे. कोरससाठी हॅप्पी डॅमिकने साथ दिली असून मिक्सिंग मास्टरिंग तनय गज्जर यांचे आहे.

या गीताच्या निर्मितीचीसुद्धा एक कथा आहे. शान यांना स्वत:चे युटय़ुब चॅनल काढण्याची इच्छा होती. चॅनल लाँच करताना त्याची सुरुवात गाण्यांनी व्हावी असं त्यांना वाटत होतं. चांगल्या कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने करतात. त्यामुळे युटय़ुब चॅनलचा ‘श्रीगणेशा’ बाप्पाच्या गीतानेच व्हावा या कल्पनेतून हे गीत साकार झाले. आपली जन्मभूमी-कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने युटय़ुब चॅनलचं पहिलं गीत मराठी असावे यासाठी शान आग्रही होते.

Related posts: