|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अवयवदान जनजागृतीत रत्नागिरी जिल्हा अव्वल!

अवयवदान जनजागृतीत रत्नागिरी जिल्हा अव्वल! 

जान्हवी पाटील/ रत्नागिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी अवयवदान मोहिमेला सुरूवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान  ही मोहीम प्रभावीपणे संपूर्ण राज्यात राबवली. परिणामी राज्यात अभियानापूर्वी अवयवदानाची असलेली संख्या वर्ष अखेरीस 131 पर्यंत गेली. त्यामुळे 192 किडनी, 116 लिव्हर, 35 हृदय व 2 फुफ्फुस उपलब्ध होवून गरजू रूग्णांना नवजीवन मिळाले. या कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाव्दारे महाराष्ट्राला व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान अवयवदान जनजागृतीत रत्नागिरी जिल्हा कोकणातील 7 जिल्हय़ांमध्ये अव्वल ठरला असून जिल्हय़ाने गतवर्षी अभियानादरम्यान 650 अवयवदानाचे संमतीपत्र भरून घेतले आहे. 

  शासन निर्णयान्वये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. त्यासाठी जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी, यासाठी गतवर्षीपासून ही मोहीम व्यापकतेने घेण्यात आली. परिणामी महाराष्ट्रातील तब्बल 345 रूग्णांना अवयवदानामुळे पुनर्जन्म मिळाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री यांनी राज्यात घेतलेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे आणि परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहे. यावरून अवयवदानाचे महत्व लक्षात घेवून अवयवदानाविषयी जागरूकता आणखीन वाढवा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्हय़ातही अवयवदान अभियान व्यापकपणे हाती घेण्यात आली आहे. यावर्षीही 29 व 30 ऑगस्ट रोजी दोन दिवसाचे महाअवयवदान अभियान वैद्यकीय शिक्षण विभागाव्दारे राबवण्यात येत आहेत. या राज्यस्तरीय अवयवदान अभियानादरम्यान विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेवून यशस्वी करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रदीप पी.यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी अवयवदान समितीबरोबर एक बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी अवयवदान जनजागृतीत रत्नागिरी जिल्हा कोकणातील 7 जिल्हय़ांमध्ये अव्वल असल्याचे आवर्जून नमूद केले. रत्नागिरी जिल्हय़ाने गतवर्षी अभियानादरम्यान 650 अवयवदानाचे संमतीपत्र भरून घेतले आहे.

जागरूकता वाढवणे महत्वाचे: जिल्हाधिकारी

तसेच यावर्षी महाविद्यालयांमधील 18 वर्षावरील मुलांसाठी अवयवदानाविषयी अधिक जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून युवावर्गाकडून जागरूकता चांगल्या प्रकारे राबवता येईल, असे प्रदीप पी. यांनी सांगितले. केवळ अवयवदानाचे संमतीपत्र भरून न घेता या अभियानाचे उद्दीष्ट स्पष्ट करा, नागरिकांना याचे महत्व पटवून सांगा, नागरिकांनी स्वत:हून हे संमतीपत्र भरून दिले पाहिजे, अशा पध्दतीने याची जागरूकता वाढवणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवयवदानाविषयी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाने जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती घटीत केली असून ही समिती जिल्हय़ात विविध कार्यक्रमाव्दारे अभियानाचे महत्व स्पष्ट करणार आहे.

जागरूकतेमुळे महाराष्ट्र शासनाला व्दितीय पुरस्कार

जागतिक पातळीवर विचार केला असता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारताबाहेर जास्त असून भारतात त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा आमूलाग्र बदल घडवून आणू शकेल. कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाची जाणीव असल्यास अवयवदानासाठी संमती सहज मिळू शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून स्पष्ट केले आहे. मात्र आता अवयवदानाची जागरूकता वाढल्यानेच महाराष्ट्र शासनाला याबद्दल व्दितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रथम पुरस्कारासाठी आणखीन खूप चांगले काम याविषयी होणे आवश्यक असल्याचे आरोग्य खात्याकडून परिपत्रकात नमूद केले आहे.

Related posts: