|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आरतीच्यावेळी दोन गटातील हाणामारीत 14 जण जखमी

आरतीच्यावेळी दोन गटातील हाणामारीत 14 जण जखमी 

वार्ताहर/ संगमेश्वर

नळपाणी योजनेचा जुना वाद ऐन गणेशोत्सवात उफाळून आल्याने गणपतीची आरती सुरु असतानाच 2 गटात झालेल्या हाणामारीत 14 जण जखमी झाले. ही घटना तालुक्यातील डिंगणी-गवळवाडी येथे घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

  संगमेश्वर पोलीस ठाण्यात महेश तुकाराम मिरगल (38, रा. डिंगणी-गवळवाडी)  यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान गणेशोत्सवाची आरती सुरु असताना येथील जुन्या नळपाणी योजनेच्या वरुन झालेल्या वादावादातून सुरेश सखाराम मिरगल, गणपत गोपाळ मिरगल, लक्ष्मण गोपाल मिरगल, संतोष धोंडू खेडेकर, ओंकार प्रकाश मिरगल, अभिजित प्रकाश मिरगल, दिगंबर भोजने, दिनेश काशीनाथ खेडेकर, काशीनाथ गणू खेडेकर, विठ्ठल धोंडू खेडेकर, रामचंद्र बाबू मिरगल, प्रकाश सखाराम मिरगल, सुमती लक्ष्मण मिरगल, प्रमिला संतोष खेडेकर, सुनिता काशिनाथ खेडेकर यांनी गैरकायदा जमाव करुन नरेश जयराम मिरगल, केतन सखाराम खेडेकर, सखाराम पांडुरंग खेडेकर, जयराम रत्नू मिरगल, उर्मिला मिरगल, राकेश मिरगल, महेश तुकाराम मिरगल, विलास तुकाराम मिरगल या आठजणांना धक्काबुक्की, टाळ तसेच शिवीगाळ करत मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. महेश तुकाराम मिरगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तर सुरेश सखाराम मिरगल यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, महेश मिरगल, शाम मिरगल, दीपक खेडेकर, नरेश मिरगल, विलास मिरगल, संजय खेडेकर, केतन खेडेकर, राकेश खेडेकर, रुपेश खताते, सुधीर खेडेकर, सखाराम खेडेकर, तुकाराम मिरगल, जयराम मिरगल, चंद्रकांत भोजने, शिवराम खेडेकर, काशीनाथ खेडेकर व अक्षय खेडेकर यांनी गैरकायदा जमाव करुन आमच्या गटातील लोकांना मारहाण तसेच शिवीगाळ केली. यामध्ये सुरेश मिरगल, लक्ष्मण मिरगल, गणपत मिरगल, रामचंद्र खेडेकर, काशिनाथ खेडेकर, प्रकाश मिरगल हे जखमी झाले आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दुसऱया गटातील 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिंगणी-गवळवाडीतून दोन गटातून दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरुन 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. दरम्यान जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नळपाणी योजनेचा वाद गणेशोत्सवात उफाळला   

डिंगणी-गवळवाडीत जवळपास 18 घरे आहेत. या घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी 8 वर्षापूर्वी या वाडीतील मंडळीनी एकत्र येत नळपाणी योजना उभारली होती. परंतु नंतर झालेल्या वादातून वाडीत दोन गट पडले. हे दोन्ही गट शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान आपल्या गटात आरती करत हेते. आरती करत असताना दोन गट जवळ आल्याने नळपाणी योजनेचा विषय पुढे आला. मात्र जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात मोठय़ा प्रमाणात धुमचक्री होवून मारहाण व शिवीगाळ झाली. ऐन गणेशोत्सवादरम्यान झालेल्या वादात दोन्ही गटातील 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related posts: