|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लाडक्या ‘गौराई’चे आज आगमन

लाडक्या ‘गौराई’चे आज आगमन 

सुवासिनी, माहेरवाशीणींची लगबग वाढली

स्वागतांच्या विविध प्रथांचा रंगणार सोहळा

प्रतिनिधी /रत्नागिरी

गणरायाच्या पाठोपाठ येणारी माहेरवाशीण गौराईचे आज मंगळवारी आगमन घरोघरी होणार असल्याने महिलांवर्गात चैतन्याचे वातावरण पसरलेले आहे. लाडक्या गौराईच्या स्वागतासाठी सुवासिनी महिला आतुर झाल्या आहेत. गौरीला त्या-ठिकाणच्या पाणवठय़ावरून आणण्यासाठी विविध प्रथांची पर्वणी आज पहावयास मिळणार आहे.

गणपती बरोबरच ‘गौरी’चे आगमनालाही या सणात मोठे महत्व आहे. या सणाच्या निमित्ताने माहेरवाशीणी आर्वजून आपल्या माहेरच्या घरी येत असतात. त्यानिमित्ताने माहेरच्या मंडळींशी भेटीगाठी होतात. गौरीचे आगमन पाणवठय़ांवरून केले जाते. तिच्या आगमनाच्या प्रथाही गावा-गावात, शहरातून वेगवेगळय़ा पहावयास मिळतात. कोकणात काही ठिकाणी खडय़ांच्या गौरी तर काही ठिकाणी हळद व पत्रीच्या गौरी आणल्या जातात. गौराईला घरात घेण्यापूर्वी ज्या सुवासिनी किंवा मुलीच्या हातात गौरी असतात तिच्या पायावर पाणी ओतून, मग हळदकूंकू लावून घरात तिचे स्वागत केले जाते.

काही ठिकाणी केवळ मुखवटे लावून गौरीला सुंदर साडीमध्ये सजवले जाते. एक जेष्ठा तर दुसरीला कनिष्ठा अशीही प्रतिष्ठापना केली जाते. नवी कोरी साडीचोळी, नथ, मंगळसूत्र अशा रुपात तिला सजवून गौराई आगमनाचा सोहळा साजरा केला जातो. त्यावेळी नवविवाहीतांची लगबग पाहण्याजोगी असते. त्यानंतर सुवासिनी महिला गौरी पुजनाचा कार्यक्रम होतो. गौरी आगमनानंतर महिलांच्या झिम्मा-फुगडय़ांचा कार्यक्रमही रंगतात. ज्येष्ठ महिलांच्या मागदर्शनाने तिची प्रतिष्ठापना केल्यावर सात दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी तिलाही निरोप देण्यात येतो.

Related posts: