|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मनोहर पर्रीकर यांचा दणदणीत विजय

मनोहर पर्रीकर यांचा दणदणीत विजय 

गोव्यात दोन्ही जागा भाजपकडे, काँग्रेसला धक्का, आंध्र प्रदेशातील जागा टीडीएसने राखली, दिल्लीत आपला दीर्घ काळानंतर दिलासा

वृत्तसंस्था/ पणजी, नवी दिल्ली

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी पोट निवडणुकीमध्ये दणदणित विजय मिळवला आहे. तर वालपोईमध्ये विश्वजीत राणेंच्या रुपाने भाजपने काँग्रेसकडून जागा हिसकावून घेतली आहे. तिकडे राजधानी दिल्लीमध्ये राम चंदर यांनी बावना मतदार संघातून दणदणीत विजय मिळवत दीर्घ काळाने आपला दिलासा दिला आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंच्या टीडीएसने नांद्याळ मतदार संघ स्वतःकडेच राखला आहे. ब्रह्मानंद रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसच्या शिल्पा मोहन रेड्डी यांचा पराभव केला आहे.

देशाभरातील बावना (दिल्ली), पणजी, वाळपोई (गोवा) आणि नंदयाळ (आंध्र प्रदेश) या चार विधानसभा मतदार संघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी 23 रोजी मतदान झाले होते. त्याची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे. गोव्यामध्ये भाजपने वाळपोईची जागा हिसकावून घेतल्याने या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा फायदा झाला आहे.

देशातील चार मतदार संघात पोट निवडणूक

बावना मतदार संघातील आपचे आमदार वेद प्रकाश यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर आंध्र प्रदेशाच्या नंदयाळ मतदार संघाचे आमदार भूमीनागा रेड्डी यांच्या निधनाने ती जागा रिक्त होती. पणजीमध्ये मनोहर पर्रीकर यांच्यासाठी सिद्धार्थ कुनकालीनेकर यांनी राजीनामा दिला होता. आणि वाळपोईतील काँग्रेसचे आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे या चार मतदार संघात पोट निवडणूक घेण्यात आली. या मतदार संघांत संबंधितांनी वर्चस्व राखले. मात्र पक्षबदलामुळे झालेल्या घडामोडीत गोव्यामध्ये भाजपला फायदा झाला आहे.

पर्रीकरांचा विजय अन् संख्याबळात 1 ने वाढ

गोव्यात माजी संरक्षण मंत्री व नूतन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी कुनकालीनेकर यांनी राजीनामा दिला होता. अपेक्षेप्रमाणे येथे पर्रीकर यांनी गोवा सुरक्षा मंचचे आनंद चोडणकर आणि काँग्रेसचा पराभव केला आहे. येथे 70 टक्के मतदान झाले. पर्रीकर यांनी 9862 मते मिळवून काँग्रेसचे गिरीश चोडणकर (5059) यांचा 4800 मतांनी पराभव केला. तथापि पर्रीकर यांनी आपल्याला अजूनही 138 मते कमी पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गोवा सुरक्षा मंचने फाटाफुटीचा मार्ग अवलंबला. मात्र त्यांच्या आनंद चोडणकर यांना अवघी 220 मते मिळाल्याने गोसुमंला थारा मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाळपोई मतदार संघातून विश्वजीत राणे यांनी 10066 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी 16188 मते मिळवली. राणे यांच्या विजयामुळे गोव्यात भाजपचे संख्याबळ 1 ने वाढले आहे. तर काँग्रेसचे नुकसानच झाले आहे. राणे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सत्ता स्थापनेला विलंब झाल्याने तसेच दुर्लक्ष केल्याने राजीनामा दिला होता. या नाराजीचा काँग्रेसला पोट निवडणुकीतही चांगलाच फटका बसल्याचे या निवडणुकीने सिद्ध झाले आहे.

भाजपचे संख्याबळ 14 वर

या निवडणुकीआधी भाजपचे संख्याबळ 13 तर काँग्रेसचे 17 होते. मात्र राणे यांचा भाजप प्रवेश आणि आताच्या पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय यामुळे भाजपच्या संख्येत 1 ने वाढ होऊन 14 तर काँग्रेसचे संख्याबळ घटून 16 झाले आहे. गोव्यात सध्या भाजपसह गोवा फॉरवर्डचे 3, मगोपक्षाचे 3 आणि अपक्ष 3 असे नऊ बिगर भाजप सदस्यांसह सरकार स्थापन करण्यात आले आहे. या निवडणुकीनंतर या सरकारला आणखी थोडे स्थैर्य प्राप्त होणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.

दिल्लीत आपला दिलासा

दिल्लीमध्ये आपच्या राम चंदर यांनी पक्षाला चांगलाच दिलासा दिला आहे. पंजाब, गोवा, बिहार विधानसभा आणि दिल्ली मनपा निवडणुकीमध्ये आपला चांगलाच दणका बसला होता. पक्षाचे मनोधैर्य चांगलेच खच्ची झाले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही कुमार विश्वास आणि कपिल मिश्रा यांनी आरोप करुन जेरीस आणले होते. परंतु बावना पोटनिवडणुकीतील विजय अरविंद केजरीवाल आणि आपसाठी दिलासा देणारा तसेच पक्षाचे मनोधैर्य वाढवणारा ठरणार आहे.

भाजपचा करिश्मा वेद प्रकाश यांना तारु शकला नाही

राम चंदर यांनी भाजपच्या वेदप्रकाश यांचा पराभव केला आहे. वेद प्रकाश यांनी मे महिन्यात आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु भाजपचा करिश्मा त्यांना पुन्हा निवडून देऊ शकला नाही. त्यांना पराभव पत्करावा लागला. चंदर यांनी 55 हजारहून अधिक मतांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. राजौरी गार्डन पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने भाजपला येथेही विजयाचा विश्वास वाटत होता. परंतु तो फोल ठरला आहे.

आंध्र प्रदेशात चंद्रबाबूंचा जगमोहनना धक्का

आंध्र प्रदेशमधील नंदयाळ पोट निवडणुकीमध्ये टीडीपीने वायएसआर काँग्रेसला 27 हजारहून अधिक मतांनी धूळ चारली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी या निवडणुकीतील विजय अधिक प्रतिष्ठेचा बनला होता. वायएसआयचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी आणि चंद्राबाबू यांनी एकमेकांवर जोरदार आरोपप्रत्यारोप केल्याने निवडणुकीला वेगळेच वलय प्राप्त झाले होते. नागा भूमी रेड्डी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर चंद्राबाबुंनी त्यांचे पुतणे नागा ब्रह्मानंद रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. तर वायएसआरने विकास कामांचे मुद्दे उपस्थित करताना शिल्पा मोहन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. परंतु टीडीपीने तब्बल 27 हजार मतांनी वायएसआरचा पराभव केला. पुढील वर्षी येथे विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने या पोट निवडणुकीचा त्यांना फायदाच होणार आहे.

पोटनिवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपीएटीचा वापर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम वापराबाबत जोरदार हंगामा झाला होता. भाजपच्या विजयानंतर इव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला. तर निवडणूक आयोगाने सर्व आक्षेप फेटाळत प्रतीआव्हान दिले होते. मतदारांना मतादानाविषयी खात्री होण्याकरता पावती (व्हीव्हीपीएटी) देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या पोट निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच इव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी देण्यात आली होती. त्यामुळे मतदारांना त्यांनी दिलेल्या मताबाबत खात्री मिळवणे शक्य झाले होते.

 

Related posts: