|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दोन्ही काँग्रेसकडून निष्ठावंतांना संधी

दोन्ही काँग्रेसकडून निष्ठावंतांना संधी 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिकेच्या स्थायी समितीवर काँग्रेसचे सहा तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची बिनविरोध निवडी करण्यात आल्या. दोन्ही काँग्रेसकडून निष्ठावंत सदस्यांची संधी देण्यात आली. काँग्रेसकडून किशोर लाटणे व धोंडुबाई कलकुटगी या दोघांनी पुन्हा संधी देण्यात आली. दरम्यान पुढील आठवडय़ात होणाऱया स्थायी समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसकडून रोहिणी पाटील या प्रबळ दावेदार ठरणार आहेत.

महापालिका स्थायीमधून काँग्रेसचे काँग्रेसचे संतोष पाटील, प्रदीप पाटील, निर्मला जगदाळे, अलका पवार धोंडुबाई कलकुटगी, बेबीताई मालगावे तर राष्ट्रवादीचे राजू गवळी व मनगुआबा सरगर असे आठ सदस्य स्थायीतून झाल्याने त्यांच्या जागी नुतन आठ सदस्यांची निवड सोमवारी विशेष महासभेत करण्यात आली. काँग्रेसकडून विद्यमान दोघांना पुन्हा संधी देण्यात आली तर राष्ट्रवादीकडून आत्तापर्यंत संधी न मिळालेल्या दोघा आणि नव्याने चार अशा सहा जणांना संधी देण्यात आली.

काँग्रेसकडून रोहिणी सत्यजित पाटील, किशोर गणपत लाटणे, धोंडुबाई राजाराम कलकुटगी, बबीता संजय मेंढे, प्रशांत पायगेंडा पाटील, मृणाल चेतन पाटील, यांची तर राष्ट्रवादीकडून महेंद्र रमाकांत सावंत, आणि जुबेर इब्राहिम चौधरी यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे पक्षप्रतोद किशोर जामदार व राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते शेडजी मोहिते यांनी या सदस्यांच्या नावाचे पाकीट सभागृहात महापौर यांच्याकडे देण्यात आले त्यांनी या नावांची घोषणा केली.

सभापतीपदासाठी रोहिणी पाटील आघाडीवर

दरम्यान, 31 रोजी स्थायी समितीच्या विद्यमान सभापती सौ. संगीता हारगे यांची मुदत संपत असल्याने नुतन सभापती निवडी प्रक्रिया पुढील आठवडय़ात होणार आहे. सभापतीसाठी काँग्रेसचे स्थायीतील संख्याबळ निम्म्यावर असले तरी यावेळी काँग्रेसचाच सभापती होईल तसे निर्देश नेते डॉ. पतंगराव कदम यांनी दिले आहेत. या पदासाठी चर्चेत असलेले सांगलीवाडीचे दिलीप पाटील व राजेश नाईक यांना स्थायीत संधी दिली नसल्याने त्यांचा पत्ता कट झाला असल्याने आता या पदासाठी काँग्रेसकडून रोहिणी पाटील या प्रबळ दावेदार बनल्या आहेत.

निष्ठावंतांनाच संधी

स्थायीमध्ये ज्या आठ सदस्यांच्या निवडी झाल्या, यामध्ये दोन्ही काँग्रेसने बहुतांशी निष्ठावंत असलेल्यानांच संधी दिल्याची चर्चा आहे. निष्ठावंत असलेले लाटणे आणि कलकुटगी यांना पुन्हा संधी दिली असून कलकुटगी या डॉ. पतंगराव कदम गटाच्या कट्टर समर्थक आहेत. याशिवाय रोहिणी पाटील याही जयश्रीताई पाटील यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. त्यांची महापौरपदाची मागणी होती. राष्ट्रवादीकडूनही निष्ठावंतांनाच संधी दिली असून सावंत हे आणि चौधरी हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत मानले जातात.