|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पिंप्रद डेरा सच्चा सौदा आश्रमाभोवती पोलीस बंदोबस्त

पिंप्रद डेरा सच्चा सौदा आश्रमाभोवती पोलीस बंदोबस्त 

प्रतिनिधी/ फलटण

सीबीआयच्या कोर्टाने डेरा सच्चा सौदा करून गुरमित राम रहीम याला दहा वर्षाची शिक्षा सोमवारी सुनावली असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील पिंप्रद या गावी डेरा सच्चा सौदाचा आश्रम असल्याने या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, या उद्देशाने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पिंप्रद (ता. फलटण) येथील गरमित बाबा रामरहीम यांच्या डेरा सच्चा सौदा आश्रमात स्थानिक लोक वगळता सध्या या ठिकाणी अन्य व्यक्ती कोणीही वावरताना दिसत नाहीत. या परिसरात पूर्णपणे शांततेचे वातावरण दिसून येते. न्यायालयाने सीबीआय कोर्टाने गुरमित बाबा रामरहीम यास दहा वर्षाची शिक्षा सुनावल्याने पिंप्रद परिसरात आश्रमाभोवती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहा पोलीस कर्मचारी रात्रंदिवस तैनात करण्यात आले आहेत.

बाबा गुरमित रामरहिमचे नाव वेगवेगळ्या प्रकरणात झळकू लागल्यानंतर हळू हळू बाबांचे फलटण व परिसरातील अन्य अनुयायी कमी होवू लागल्याचे चित्र आहे. पिंप्रद येथील आश्रम गेल्या 12 वर्षापासून सुरू असून या ठिकाणी दर रविवारी 100 ते 150 बाबांचे अनुयायी सत्संगासाठी येत असत, हे अनुयायी सोडून आतमध्ये नेमके काय चालते, याबद्दल स्थानिकांना कोणत्याही प्रकारची माहिती नसते. दरम्यान, पंचकुलातील हिंसाचारानंतर बाबा गुरमित रामरहिम यांच्या पिंप्रद येथील आश्रमाबाबत काय होणार याची उत्सुकता लागली होती. अनेक लोक गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी डोकवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वॉल कंपाऊंड व आश्रमाची इमारत सोडली, तर त्या ठिकाणी पूर्ण स्मशान शांततेचे चित्र आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी आजच्या निकालानंतर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यापूर्वी आश्रमाभोवती कोणतीही हालचाल नसल्याने पोलिसांनीही याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र, आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फलटण तालुक्यात बाबा रामरहीम यांचा मोठा शिष्यगण असून त्यांच्या आग्रहाखातर बाबा राम रहीम यांनी अफाट खर्च करून गेल्या 10 वर्षापूर्वी 7 एकर जागेत सुमारे 50 लाख रूपये खर्च करून अवघ्या 3 दिवसात हजारो भक्तांच्या श्रमदानातून आश्रम उभारला आहे. या आश्रमाच्या उभारणीमुळे तसेच स्वतः राम रहीम बाबा येथे आल्याने त्यावेळी अवघा तालुका ढवळून निघाला होता. सर्व धर्मासाठी आश्रम बांधल्याचे आणि तेथून प्रवचनाचे आणि धार्मिक कार्यक्रमाचे त्यावेळी बाबांनी सांगितले होते. त्यावेळी बाबांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. नंतरच्या काळात आश्रमात जाणाऱया लोकांची गर्दी कमी होत गेली आश्रमात नेमके काय चालते हेही कळेनासे झाले होते. आश्रमात राहणारे लोक बाहेरच्या लोकांच्या मिसळत नव्हते आश्रमाला मोठे बाहेरून मोठे कंपाउंड आणि मोठे गेट केल्याने बाहेरून जाणार्या आतील काहीही दिसत नव्हते. तालुक्यातील बाबांच्या भक्तगणांपैकी अनेकांनी हरियाणातील मुख्य आश्रमाला भेट दिली होती. आज बाबाला शिक्षा झाल्याने पिंपरदच्या आश्रमाकडे अनेकांनी धाव घेवून पाहणी केली मात्र तेथे 2/3 सेवेकरी वगळता पूर्ण शांततेचे वातावरण होते. एकूणच पिंपरद मध्ये शांत वातावरण आणि कडक पोलीस बंदोबस्त असे चित्र आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अशोक शेळके व त्यांचे सहकारी आश्रमाकडे लक्ष ठेवून आहेत.