|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्रमदानातून जलशिवार योजना राज्यात इतिहास घडवेल

श्रमदानातून जलशिवार योजना राज्यात इतिहास घडवेल 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी 

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत श्रमदानातून व लोकवर्गणीतून सुमारे 16 लाख रुपये खर्चाचे विहिर खुदाईचे काम करुन, राज्यामध्ये इतिहास घडविला जाईल, असे प्रतिपादन पुणे म्हडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाण्याचे पूजन करण्यात आले.

बोळावीवाडी ता. कागल येथे जलयुक्त शिवार योजनेतील कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, नवोदिता घाटगे, उमेश देसाई, राजाभाऊ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. ही योजना पूर्ण करण्यासाठी किसन क्रूप पुणे यांचे सहकार्य मिळणार आहे.

जलयुक्त शिवार योजनेस शहीद जवान धेंडीराम वेटाळे व शहीद जवान सुभाष भोळे यांची नावे दिल्याचे सांगून घाटगे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाला आपण जेंव्हा सुरुवात केली. तेंव्हा अनेकांना शंका वाटत होती. मात्र तीनच महिन्यानंतर केलेल्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला. बघता बघता 16 लाख रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात झाली. शासनाच्या निधीची वाट न पाहता आज श्रमदान आणि लोकवर्गणी जमा करुन या कामाला सर्वांनीच सहकार्य केले आहे. राजर्षी शाहू महाराजांचे केवळ नाव न घेता त्यांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे. बोळावीवाडी या गावाला लांबून पाणी आणावे लागत आहे. त्यासाठी  भरमसाठ पाणीपट्टी ग्रामस्थांना द्यावी लागते. मात्र येथेच पाण्याची चांगल्या पध्दतीने व्यवस्था केल्यास व वाया जाणारे पाणी अडविले जाणार असल्याने कमी खर्चामध्ये हे पाणी लोकांना उपलब्ध होणार आहे.

याशिवाय जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आपण जी सहा गावे निवडली आहेत. त्या कामाचे नियोजन केले असून त्यासाठी लागणारा निधीही लोकवर्गणीतून जमा करण्याचे काम सुरु आहे. लवकरच याही कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात सर्व कामे पूर्ण करुन ज्या गावामध्ये टंचाई जाणवते तेथे जलयुक्त शिवार अभियान आपण श्रमदानातून व त्यासाठी लागणारा निधी हा लोकवर्गणीतून उभा करु, असे त्यांनी स्पष्ट पेले.

यावेळी तुकाराम कडाकणे, अवधूत ढोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, गडहिंग्लज मार्केट कमिटीच्या अध्यक्षा सारिका चौगुले, सुनीलराज सूर्यवंशी, करणसिंह रणनवरे, बॉबी माने, सरपंच कोगे, उपसरपंच दादासो ढेंगे, प्रकाश गेंगे-पाटील, विठू करडे, संजय चौगुले आदी उपस्थित होते.

Related posts: