|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गणेशोत्सवातून वारकरी परंपरा जोपासा-पोलिस अधिक्षक शिंदे

गणेशोत्सवातून वारकरी परंपरा जोपासा-पोलिस अधिक्षक शिंदे 

प्रतिनिधी/ मिरज

गणेशोत्सव कालावधीत जिह्यात डॉल्बीवर पूर्णतः निर्बंध घालण्यात आले आहेत. काही मंडळांकडून मात्र ‘एक टॉप एक बेस’च्या नावाखाली प्रशासनाची फसवणूक केली जात आहे. पण आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आल्यास अशा मंडळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला. आपली संस्कृती जतन करण्याबरोबर वारकरी परंपरा जोपासा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील नदिवेस भागात असलेल्या शिवाजी गणेशोत्सव मंडळाने गेल्या काही वर्षापासून पारंपारीक उत्सवाला प्राधान्य देत वेगवेगळ्या धार्मिक, सांस्कृतीक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करुन जिह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. चालुवर्षीही या मंडळाने अनेक नामवंत किर्तनकारांना निमंत्रीत करुन त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याची दखल घेऊन पोलिस अधिक्षक शिंदे यांनी सोमवारी रात्री या मंडळाच्या आरतीला उपस्थित राहून त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचे कौतुक केले. शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला.

गणेशोत्सव चांगल्या पध्दतीने साजरा करावा, ज्यामुळे समाजासमोर वेगवेगळे प्रबोधन घडेल, पण काही मंडळांकडून मिळालेल्या संधीचा दूरपयोग करुन प्रशासनाला फसविण्याचा प्रयत्न केला जातो. एक टॉप एक बेसच्या नावाखाली काही मंडळे डॉल्बीसारखा दणदणाट करताना निदर्शनास आले आहेत. अशांवर निश्चित कारवाई केली जाईल. मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना आपली सामाजिक, सांस्कृतीक परंपरा जोपासाली पाहिजे. वारकरी संप्रदायास प्राधान्य दिल्यास प्रबोधनाचा बराच मार्ग मोकळा होतो. शिवाजी गणेशोत्सव मंडळाने कित्येक वर्षे ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. त्याचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही दत्तात्रय शिंदे म्हणाले.

प्रारंभी कमलाकर मिसाळ यांनी स्वागत तर अनिल रसाळ यांनी प्रास्ताविक केले. श्री विसर्जनवेळी रथाला ट्रक्टर ऐवजी बैलगाडी जोडणाऱया गुंडा आण्णा  मगदूम यांचा यावेळी पोलिस अधिक्षक शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय उपाधीक्षक धीरज पाटील यांचा संतोष जाधव यांच्या हस्ते, निरीक्षक सदाशिव शेलार यांचा राजाराम पवार यांच्या हस्ते तर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांचा अशिष पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोल्याचे नामवंत किर्तनकार गजानन भगवान शिंगारे यांचे किर्तनही झाले. यावेळी विलास शिंदे, सावंता म्हेत्रे, हरिसिंग रजपूत, गजानन लोहार, दत्ता पवार, सदाशिव पवार या वारकऱयांसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी मानले.

Related posts: