|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक वापरासाठी 5 सप्टेंबरपर्यंत सूट

गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक वापरासाठी 5 सप्टेंबरपर्यंत सूट 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवारी गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी सूट देण्याचा आदेश दिला असून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  जिल्हय़ामध्ये गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होत असल्याने गणेशोत्सवासाठी एकुण पाच दिवसांसाठी पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरासाठी सूट देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हाधिकाऱयांना गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरासाठी सूट देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकाऱयांना वर्षभरात होणारे उत्सव व सण, समारंभ लक्षात घेवून एकुण वर्षासाठी 15 दिवस पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरासाठी सूट देण्याचा आदेश काढला आहे.

   या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मंगळवार 29 रोजी सातव्या दिवशी, गुरुवार 31 ऑगस्ट रोजी दहाव्या दिवशी, रविवार 3 सप्टेंबर रोजी अकराव्या दिवशी, सोमवार 4 सप्टेंबर रोजी आणि बाराव्या दिवशी, अनंत चतुर्थी मंगळवार 5 रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरासाठी सूट देण्यात आली आहे. सूट देण्याचा आदेश दिला असला तरी ध्वनियमर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करणे, तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सातारा यांची असेल, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.