|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कास पठारच्या हंगामाचे उदघाटन 1 संप्टेबरला होणार

कास पठारच्या हंगामाचे उदघाटन 1 संप्टेबरला होणार 

वार्ताहर/ कास

विविध रंगीबेंरगी रानफुलांनी नटणारे जागतिक वारसास्थळ कास पठार या पर्यटन स्थळांचा या वर्षीचा हंगामासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महासमितीने हंगामाच्या नियोजनाची तयारी पूर्ण केली असून यावर्षी पर्यटकांना विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, त्याचबरोबर करामध्ये सवलतीही दिल्या जाणार आहेत. या हंगामाची सुरवात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, वनपरिक्षेत्राचे अधिकारी अरविंद पाटील, उपवनसंरक्षक अनील अंजनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

  काही दिवसापूर्वीच कास पठारच्या नियोजनासाठी नव्याने महासमिती स्थापन करण्यात आली आहे. या महासमितीने हंगामाच्या पूर्वसंध्येला होणाऱया बैठकीत नियोजनावर जोर दिला असून कास पुष्प पठारचा हंगामा शुक्रवार पासून सुरु होणार आहे. या पठारवर येणाऱया पर्यटकांना प्रति मानसी 100 रूपये प्रवेश शुल्क आकारला जाणार आहे. शाळा, कॉलेजच्या सहलीतील विदय़ार्थांना प्रत्येकी सवलतीच्या दराने 20 रुपये कर अकारला जाणार असून यावर्षी पार्किंग कॅमेरा गाईड आदी अनेक कर रद् करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पठार परिसरात पर्यटनास फुलांना हानी पोहचवणाऱया व हुल्लडबाजी करणाऱया अतिउत्साही पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय वनविभागासह महासमितीने घेतला आहे.

  गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊन-पावसाच्या खेळामुळे पठाराच्या हंगामाला उशीरा सुरवात होत असून पठारवर आता गेंद कापरू, शितेची, आस्वे, तेरडा भुईचक्र, वेल, चवर, अमरी, टुथ ब्रश आदी पंधरा ते वीस जातीची फुले उमलण्यास सुरवात झाली आहेत. काही दिवसातच पठार रंगीबेरंगी रानफुलांनी बहरुन जाण्याची स्थिती निर्माण झाली असून गेल्यावर्षी सात ते आठ वर्षातून एकदा फुलणारी  कारवी, खरवरच्या निळसर जांभळ्या फुलांनी पठारसह परिसर बहरून गेला होता. 

   कास पठार व पर्यकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महासमितीने स्थानिक 6  गावातील 100 हून अधिक सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये महिलांचा सहभागही करण्यात आले आहे. महासमितीने पर्यटक, कर्मचाऱयांच्या सोईसुविधेच्या दृष्टीने पठारवर शेड ऑफीस उभे करण्यात आले आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वीज पुरवठा, सीसीटीव्ही कॅमेरे, गाईड  पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

  तसेच हंगामाच्या काळात पठारवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग झोन कायम ठेवण्यात आला आहे. यामध्ये मोठी वाहने व अवजड वाहने ही आटाळी फाटा येथे पार्क केली जाणार आहेत. त्याचबरोबर कास पठारवर कोणीही वाहन पार्क केल्यास त्यांच्या वाहनांना जॅमर (टोचन) लावले जाणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महासमितीने दिली. शासकीय सुट्टीच्या दिवशी पठारवर पर्यटकांचा लोंढा मोठय़ा  प्रमाणात येत असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी व हुल्लडबाजीचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची ज्यादा कुमकही मागवण्याचा व वनविभागाचे कर्मचारी ही तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षीच्या नियोजनाचे कामकाज महासमितीचे अध्यक्षा विमल शिंगरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे, सचिव रोहोटचे, वनपाल सावंत हे पाहणार असून हंगामा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महासमीती सक्रीय झाली आहे.