|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीत महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला

निपाणीत महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला 

प्रतिनिधी/ निपाणी

 निपाणीत राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक टायर उलटल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 5.30 वाजता घडली. शौकतअली (वय 26), इब्राहिम (वय 22 रा. दोघेही दावणगिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना वाळवे मळ्य़ासमोर घडली. अपघातात ट्रकचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मालवाहू ट्रक क्र. (केए 17 सी 3985) हा ब्याडगीहून मिरची पावडर भरून मुंबईकडे जात होता. निपाणी महामार्गावर वाळवे मळ्य़ासमोर आल्यानंतर अचानक टायर फुटल्याने चालकाचे ट्रकवरील प्रारंभी नियंत्रण सुटले यात ट्रकची दुभाजकाला जोराची धडक बसत उलटला. यामध्ये ट्रक मालक शौकतअली व क्लिनर इब्राहीम हे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पुंजलॉईड कंपनीचे अधिकारी आण्णाप्पा खराडे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. नंतर निपाणी बसवेश्वर पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महामार्गावर वरचेवर होणारे अपघात ही डोकेदुखी बनली असून चालकानेही वाहनांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच अनेकवेळा वाहनांचे अपघात होतात.

दुचाकींच्या अपघातात युवती जखमी

निपाणी-मुरगूड रोड उड्डाणपुलानजीक दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात युवती जखमी झाल्याची घटना सकाळी 8.45 वाजता घडली. या अपघातात शितल पाटील (रा. आश्रयनगर, निपाणी) असे जखमी युवतीचे नाव आहे. दुचाकीस्वार सुरेश गिरी हा युवक आपली फॅशन प्रो क्र. (एमएच 14 बीक्यू 562) हा देवचंद कॉलेजहून निपाणी बसस्थानकाकडे जात होता. दरम्यान शितल पाटील ही युवती आपली दुचाकी क्र. (एमएच 09 एएक्स 2165) घेऊन कंपनीत कामाला जात होत्या. दुचाकीस्वार सुरेश गिरी याने उड्डाणपुलानजीक आल्यानंतर समोर जाणाऱया दुचाकीला धडक दिली. यात शितल पाटील दुचाकीवरून खाली कोसळली. अपघातात तिच्या पायाला व हाताला जोराचा मार बसला असून तिला उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.