|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आकें गणेशोत्सवात यंदा आकर्षक ‘श्रीकृष्ण रासलीला’चा फिरता देखावा

आकें गणेशोत्सवात यंदा आकर्षक ‘श्रीकृष्ण रासलीला’चा फिरता देखावा 

प्रतिनिधी/ फातोर्डा

आकें-मडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव युवक मंडळातर्फे यंदा ‘श्रीकृष्ण रासलीला’ हा फिरता देखावा गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. यात राधा-कृष्णासोबत पाच गोपिका दाखविण्यात आल्या आहेत. हातात टिपऱया व डोक्यावर घडा घेतलेल्या या गवळणी फेर धरून नाचताना आणि त्यांच्यामध्ये राधा व कृष्णाला नृत्य करताना दाखविण्यात आले आहे.

‘राधा ही बावरी, हरीची’ या मराठी गीताच्या तालावर हा फिरता देखावा खूपच आकर्षक वाटतो आणि रंगीबेरंगी कपडे त्यात भर टाकतात. या देखाव्यासाठी राधा व कृष्णाच्या मूर्तींच्या जोडीला गवळणीचे पाच पुतळे वापरण्यात आले आहेत. सर्वांची निर्मिती कागदापासून करण्यात आली असून त्यामुळे हा देखावा पर्यावरणाला पूरक आहे. प्रत्येक वर्षी निरनिराळे फिरते देखावे या मंडळाच्या गणेशोत्सवासाठी बनविण्यात येतात. यामध्ये पाण्यापासून पणत्या पेटविणारे साईबाबा, गोरा कुंभार, खांब्यातून बाहेर येणारा नरसिंह अवतार, दूध पिणारी नागदेवता, पादुकांना स्पर्श केल्यावर दर्शन देणारे विठ्ठल रखुमाई असे अनेक आकर्षक देखावे साकारण्यात आलेले आहेत.