|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘गणपती स्पेशल’ 10 सप्टेंबरपर्यंत धावणार!

‘गणपती स्पेशल’ 10 सप्टेंबरपर्यंत धावणार! 

परतीच्या प्रवासातही गर्दीचा उच्चांक कायम,

चाकरमान्यांना आता मुंबई गाठण्याची चिंता

राजू चव्हाण /खेड

गतवर्षीच्या तुलनेत गणेशोत्सवात यंदा कोकण मार्गावर धावलेल्या गणपती स्पेशल गाडय़ांमुळे ‘गावी पोहचायचे कसे’ या चिंतेला पूर्णविराम मिळाला होता. 7 दिवसांच्या बाप्पाला गुरूवारी निरोप दिल्यानंतर चाकरमानी शुक्रवारपासून परतीच्या प्रवासाची वाट धरणार आहेत. यामुळे गणेशभक्तांना आता मुंबई गाठण्याची चिंता सतावणार आहे. मात्र गणपती स्पेशल गाडय़ा 10 सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने गणेशभक्तांना हायसेच वाटले आहे. परतीच्या प्रवासातही नियमित रेल्वे गाडय़ांसह हॉलिडे स्पेशल गाडय़ांतील गर्दीचा उच्चांक कायम आहे.

विशेषतः गणेशोत्सवात रेल्वे प्रशासन एकामागोमाग एक गणपती स्पेशल गाडय़ांची कृपावृष्टी करत गणेशभक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत असते. याधर्तीवर रेल्वे प्रशासनाने यंदाही कोकण मार्गावर सर्वाधिक 250 फेऱया चालवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला होता. नियमित रेल्वे गाडय़ांच्या 10 फेऱयांसह मध्य रेल्वेच्या 202, पश्चिम रेल्वेच्या 39 रेल्वे गाडय़ांपाठोपाठ अतिरिक्त ज्यादा गाडय़ांमुळे रेटारेटीच्या प्रवासात गाव गाठायचे कसे? या चाकरमान्यांच्या चिंतेला पूर्णविराम मिळाला.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासूनचा विलंबाचा प्रवास वगळता कोकण मार्गावर तब्बल 250 ज्यादा गाडय़ांचे नेटके नियोजन रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे गणेशभक्तांना गाव गाठणे सुलभ झाले. मध्य व कोकण रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेही गणेशभक्तांच्या दिमतीला धावल्याने चाकरमान्यांच्या मार्गातील विघ्न दूर होऊन गणेशभक्तांची यातायात काहीअंशी थांबण्यास मदत झाली. 18 ऑगस्टपासून गणपती स्पेशल गाडय़ा धावू लागल्याने तुफानी गर्दीतून गावी पोहचण्याची चाकरमान्यांना सतावणारी चिंता दूर झाली होती.

परतीच्या प्रवासातही हॉलिडे स्पेशल गाडय़ा धावणार आहे. रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. या गणपती स्पेशल गाडय़ा 10 सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱया गणेशभक्तांनी सुटकेचाच निःश्वास टाकला आहे. शुक्रवारपासून चाकरमानी मुंबईची वाट धरणार असल्याने सर्वच गाडय़ा खचाखच गर्दीने धावणार आहेत. याचधर्तीवर चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसापासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुरते बिघडल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल सुरू झाले आहते. विस्कळीत वेळापत्रकामुळे मनस्ताप पदरी पडत असतानाही गणपती स्पेशल गाडय़ांमधून प्रवास करण्याचा हेका गणेशभक्तांनी सोडलेला दिसून येत नाही.

गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावर प्रथम धावलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस-चिपळूण विशेष गाडीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. 20 ऑगस्टपासून 12 बोगींची धावणारी विशेष गाडी 12 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. यापाठोपाठ 19 ऑगस्टपासून प्रथम धावलेल्या पनवेल-सावंतवाडी विशेष गाडीलाही चाकरमान्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 10 सप्टेंबरपर्यंत ही गाडी धावणार आहे. 23 बोगींच्या लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी विशेष गाडीला 8 सप्टेंबरला, तर 17 बोगींच्या लो.टिळक टर्मिनस-करमाळीला 4 सप्टेंबरला बेक लागणार आहे.

दादर-रत्नागिरी या विशेष गाडीलाही प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 18 ऑगस्टपासून सुरू झालेली ही गाडी 8 सप्टेंबरपर्यंत, तर सीएसटी-करमाळी 10 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. 18 ऑगस्टपासून सुरू झालेली 12 बोगींची दादर-सावंतवाडी विशेष गाडी 8 सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने कोकणवासियांची चांगली सोय झाली आहे. परतीच्या प्रवासातही कोकण मार्गावरून धावणाऱया सर्व हॉलिडे स्पेशल गाडय़ांना भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.