|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मांगरीच्या दारी, कोण सोबना फोडी

मांगरीच्या दारी, कोण सोबना फोडी 

अरुण इंगवले यांनी सहा वर्षांहून अधिक काळ कष्ट घेऊन तिल्लोरी भाषेचे आठ हजाराहून अधिक शब्द, शेकडो म्हणी आणि लोकगीतांचे संकलन केले आहे. अर्थात हे संकलन करताना त्यांना बऱया-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.

जागतिकीकरणात चिन्ह संस्कृतीला महत्त्व प्राप्त झाले. त्यातून भाषा संवाद तुटत गेला. त्याचा परिणाम असा झाला, की आधुनिकीकरणाचे भाषेवर आक्रमण होऊन भाषाच धोक्यात यायला लागली. यात आधी बोली नष्ट व्हायला लागल्या आणि मग विविध बोलीतून निर्माण झालेल्या प्रमाणभाषेला त्याचा धोका पोहोचू लागला. त्यातूनच आता ‘आपली बोली, आपली भाषा वाचवा,’ असे अभियानही राबवायला प्रारंभ झाला. देशातील 220 बोलीभाषा गेल्या काही वर्षात नष्ट झाल्याचे आंतरराष्ट्रीय विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. मात्र, बोली जतनाबाबत अशी उदासी एका बाजूला असतानाच दुसऱया बाजूला चिपळूण येथील आजच्या पिढीतील कवी अरुण इंगवले आपल्या ‘तिल्लोरी’ बोलीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते या बोलीतील चक्क आठ हजार शब्दांचा संकलन प्रकल्प हाती घेतात आणि तो पूर्णही करतात. बोली नष्ट होतानाच तिच्यातून निर्माण झालेली लोकसंस्कृतीही संपून चालली असतानाच्या आजच्या काळात या त्यांच्या कामाचे मोल अनमोल असेच आहे!

दर बारा कोसावर भाषा बदलते असे म्हणतात आणि हे खरेच आहे. अगदी एकाच भागात भाषेचा लहेजा बदललेलाही दिसतो. एखाद्या मोठय़ा प्रदेशात भाषा सारखीच असण्याची शक्यता नाहीच. वेगवेगळय़ा बोली तिथे ऐकायला मिळतातच पण एकाच बोलीची विविध भाषिक रूपेही पहायला मिळतात. कोकणात मालवणी आणि आगरी बोलीला जे गेल्या काही वर्षांत भाषिक महत्त्व प्राप्त झाले, तसे महत्त्व अन्य भाषांना प्राप्त झाले आहे, असे दिसत नाही. याची कारणे काय असतील, याचा विचार केला, तर त्या-त्या भाषातील ललितकलांचा विकास ज्या प्रमाणात व्हायला हवा, तसा झालेला दिसत नाही किंवा विशिष्ठ समाजाची भाषा म्हणूनच पाहिले गेल्याचाही परिणाम दिसतो. ‘तिल्लोरी’ भाषा ही प्रामुख्याने कुणबी समाजाची भाषा म्हणूनच ओळखली जाते. त्यामुळे या भाषेचा हवा तसा विकास झाला नाही का असा प्रश्न उपस्थित केला, तर त्याचे उत्तर ‘होय’ येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, आता या भाषेतील कलाकार कलाप्रांताच्या मुख्य प्रवाहात स्थिर झाल्याने आणि त्या क्षेत्रात आपल्या बोलीला आणल्याने ही भाषा महाराष्ट्राच्या इतरही भागात मालवणी, आगरी बोलीबरोबरच ओळखली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इंगवले यांनी ‘तिल्लोरी’ बोलीतील आठ हजार शब्दांचे संकलन करून पुढील काळातील भाषा संशोधकांना एक महत्त्वाची भाषिक समृद्धी उपलब्ध करून दिली आहे.

‘तिल्लोरी’ बोली ही कुणबी समाजाची बोली म्हणून परिचयाची असली तरी इंगवले यांच्या मते संगमेश्वरी बोली आणि कुणबी बोली हे एकाच बोलीचे बोलभेद आहेत. या दोन्ही बोली म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्हय़ातील ‘तिल्लोरी’- ‘कुणबी’ जो शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे, त्याचीच ही बोलीभाषा आहे. मात्र, त्यावेळी रत्नागिरी जिल्हय़ाचे मध्यवर्ती ठिकाण समजल्या जाणाऱया संगमेश्वर ठिकाणचे ‘संगमेश्वरी बोली’ असे नामाभिधान केले गेले असावे. 1905 मध्ये ग्रीअर्सन या अधिकाऱयाने कोकण प्रदेशाचा भाषिक सर्व्हे केला होता. त्यावेळी ज्या कोकणातील विविध बोली बोलणाऱयांची संख्या होती, त्यातील 1961 मध्ये भारत सरकारने केलेल्या शिरगणतीमध्ये ही संख्या फारच कमी झालेली दिसते. याचे कारण आपल्या बोली भाषेबाबतचा न्यूनगंड आणि प्रमाण भाषेच्या आकर्षणातून प्रमाण भाषेचा वाढता प्रभाव.

इंगवले यांच्या मते, आजही संपूर्ण रत्नागिरी जिल्हय़ात 55 टक्के कुणबी समाज आहे. महाराष्ट्रातील कुणबी समाजापेक्षा हा समाज भिन्न आहे. इथला कुणबी समाज स्वतःला ‘तिल्लोरी’ कुणबी समाज समजतो. या मोठय़ा समाजाची बोली आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱया अलुत्तेदार-बलुतेदार यांची त्यांच्याशी संपर्काची आणि संवादाची भाषा ‘तिल्लोरी’च होती. पेशवाईत खोतीचा प्रभाव वाढल्यावर अल्पभूधारक आणि भूमिहीन झालेला हा समाज पोटापाण्यासाठी मोठय़ा संख्येने मुंबई-पुणे अशा मोठय़ा शहरांकडे वळला. त्यातून या समाजावर पर्यायाने त्याच्या बोलीवर प्रमाण भाषेचा प्रभाव वाढत गेला आणि 1905 च्या सुमारास 17 लाखाच्यावर तिल्लोरी भाषा बोलणारा समाज 1961 च्या जनगणनेत ‘मराठी’ हीच आपली मातृभाषा असल्याचे नोंदवून मोकळा झाला. म्हणूनच या तिल्लोरी भाषेच्या संवर्धनासाठी इंगवले घेत असलेले परिश्रम भाषेवर प्रेम करणाऱया भाषाप्रेमींसाठी अभिमानास्पदच आहेत.

यासाठी इंगवले यांनी सहा वर्षांहून अधिक काळ कष्ट घेतले. यातून तिल्लोरी भाषेचे आठ हजाराहून अधिक शब्द, शेकडो म्हणी आणि लोकगीतांचे संकलन केले आहे. अर्थात हे संकलन करताना त्यांना बऱया-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. ही बोली आपली आहे, असे सांगताना अनेकांना न्यूनगंड लपवता आला नाही. इंगवले यांनी तिल्लोरी भाषेचा अभ्यास करताना काही भाषिक निरीक्षणे नोंदविली आहेत. बोलण्यात ठाशीवपणा आणण्यासाठी अर्थाची द्विरुक्ती असणारे शब्द आणले जातात. जोडाक्षरे सोपी करून सुट्टी करणे, कोडय़ात बोलणे, रुपकाच्या आधारे मांडणी करणे ही तिल्लोरी भाषेची विशेष वैशिष्ठय़े आहेत. तर ठिय्या, सवडसारखे या बोलीतील शब्द मराठीने स्वीकारले आहेत. मात्र, ‘वावडं’सारख्या तिल्लोरी शब्दाला मराठीत त्या ताकदीचे पर्यायी शब्द नाहीत.

तिल्लोरी भाषेचे भाषिक सौंदर्य मोठे आहे. त्यातील काही शब्द उदाहरणार्थ आपण पाहू शकतो. इचडा (विंचू), इन (विहीण), इकार (विषबाधा), उपेटा (उघडकीस येणे), उपाट (ओसंडून जाणे), कांडाली (भाजीचा लहानसा मळा), कांडय़ावर येणे (घायकुतीस आलेला), काण्यावर (कोपऱयावर), कडसुरी (पागोळी), कलम (पाळलेले भूत), खळगुट (खड्डा), तर तिल्लोरी बोलीतील ‘मान ना मानता नि बसाया गोणता, गाय अडली कोंडी आणि धोपट मारी धोंडी’ या प्रकारच्या म्हणीही शब्दांचे सौंदर्य खुलवितात. आकडीस कोयती, हातात कुराडी…आसं लगबगा, कुट निगालं वराडी…मांडवाच्या मेडी, सोदाया निघालं… मांगरीच्या दारी, कोण सोबना फोडी अशा लोकगीतातूनही त्याचा अधिकाधिक प्रत्यय येतो. अशी भाषिक मौलिकता जपण्यासाठी या बोलीतीलच इंगवले यांच्यासारख्या उमद्या कवीनेच या भाषेच्या जपणुकीसाठी प्रयत्न चालविले आहेत, याबाबत त्यांचे अभिनंदनच करायला हवे!

Related posts: