|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हो, मुंबईकरांच्या धैर्यामुळेच…

हो, मुंबईकरांच्या धैर्यामुळेच… 

आई, मी मित्राला आणायला चाललोय, लगेच येतो. अरे ऐक, पाणी जास्त असेल तर त्याच्याच घरी थांब, आईचा सल्ला. प्रियमने मित्राला घरी सोडले, पण तो मात्र घरी परतला नाही तो कायमचाच. कार लॉक झाली अन् त्याचा गुदमरून मृत्यू झाला. पाणी खूप आहे. तू गाडी घेऊन घरी चल… मी येतो, डॉक्टर बोलत होते.ड्रायव्हर घरी पोहोचला, मात्र डॉ. दीपक अमरापूरकर घरी पोहोचलेच नाहीत. पाण्यात वाहून गेल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती अन् अखेर ती खरी ठरली. गुरुवारी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा येथे सापडला. यासारखी कितीतरी कुटुंबे मंगळवारच्या पावसात वाहून गेली असतील. कोसळधारेने तब्बल 12 जणांचे बळी घेतले. अनेकांच्या घरातली कर्तीसवरती, रक्ताची माणसे कायमची निघून गेली. घरी पोहोचणे, मित्राला वाचवणे हा गुन्हा तर त्यांनी नाही ना केला.. मग या सर्वाला जबाबदार कोण तर पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱयांचा कोडगेपणा. त्यांची सतत पाठ थोपटून घेण्याची वृत्ती आणि काही अंशी तुम्ही आणि आम्ही. 

मंगळवारच्या तुफान पाऊसमाऱयाने अख्खी मुंबई कोलमडली. समुद्राला भरती आली आणि पावसाने रौद्र रूप धारण केले. नेहमी धावाधाव करणारी मुंबईनगरी त्यादिवशी थंडावली. वाहतुकीचे तीनतेरा वाजले. बससेवा रुतून बसली. लोकल गाडय़ांची धडधड थांबली. जागोजागी पाणी साचले. नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले. नदीनाल्यातल्या गाळाची सफाई न झाल्यामुळे ‘मुंबईची तुंबई’ झाली. मुंबईकरांचे हालबेहाल झाले. कार्यालयातून घरी जाणे शक्य न झाल्याने अनेक कर्मचाऱयांनी उपाशीपोटी रात्र ढकलली. अनेकजण टॅक्सी-रिक्षात अडकून पडले. वाहतूक कोंडीत अनेकांचा जीव घुसमटला. लोकल जागच्या जागी थबकल्याने प्रवाशी, चाकरमान्यांना लोकलमध्ये, स्थानकांवर रात्र जागून काढावी लागली, हे चित्र डोळ्य़ांसमोर आले की आठवण होते ती मुंबईकरांच्या धैर्याची, त्यांच्या ‘स्पिरीटची’. अशा परिस्थितीत मुंबईकर रस्त्यावर उतरतो आणि मदतीचा हात पुढे करतो. जीवाची पर्वा न करता सामान्य मुंबईकर नेहमीच एक पाऊल पुढे टाकतो. मंगळवारच्या पावसातही अनेक सामाजिक संस्था, मंडळे, डॉक्टरांची पथके, मुंबई पोलीस, नौदलाचे जवान, सामाजिक बांधीलकी जपणाऱया तरुण-तरुणींनी भर पावसात अडचणीत सापडलेल्यांना धीर दिला, आसरा दिला, त्यांना अन्नपाण्याची सोय करून दिली. हे स्पिरीट, या धैर्यामुळेच मुंबई सावरली. हळूहळू पूर्वपदावर आली. त्यांच्या या कामगिरीकडे दुर्लक्षून चालणार नाही. त्यांनी दाखवलेल्या साहसामुळे अनेक कुटुंबे वाचली. पण आपण काय खूप भव्यदिव्य केले, म्हणून त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याचे कधी ऐकिवात नाही.

26 जुलै 2005. आजही हा दिवस मुंबईकरांच्या मनात धडकी आणतो. त्याचीच पुनरावृत्ती 29 ऑगस्ट 2017 रोजी झाली असे म्हणण्यास वाव आहे. 26 जुलै 2005 रोजी 900 मिलीमीटर पाऊस पडला होता. तर मंगळवार 29 ऑगस्टचा पाऊस 325 मिलीमीटर इतका पडला. तरीही मुंबई घायाळ झाली.

गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेचे अधिराज्य आहे. मुंबईतल्या कोपऱया कोपऱयातली खडा न् खडा माहिती शिवसेनेला साहजिकच असेल. अशा आपत्तीत करदात्या मुंबईकरांचे हाल झाल्यानंतर, त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यानंतर, कुटुंबच्या कुटुंबं रस्त्यावर आल्यानंतर सामान्य मुंबईकर साहजिकच सत्ताधारी पक्षाकडेच बोट दाखवणार.  26 जुलैच्या घटनेनंतर मंगळवारची घडलेली घटना यात तब्बल एका तपाचे अंतर आहे. दरवेळी पावसाळा आला की नालेसफाईचा मुद्दा उकरून निघतो. या नालेसफाईत खालपासून वरपर्यंत अनेकांचे हात गाळात अडकलेले असतात. नालेसफाई परिपूर्ण होत नाही, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, नाहीतर पाणी तुंबल्याच्या घटना घडल्याच नसत्या. मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा मंगळवारच्या घटनेने पुन्हा एकदा फोल ठरवला.  मुंबई ही मायावी नगरी. इथे आलेल्या प्रत्येकाला ती सामावून घेते, पण चोहोबाजूंनी सूज येत असलेल्या मुंबईला राजकीय पक्षांनी आपापली मतदान बँक बनवले आहे. गल्लीतला कार्यकर्ता ते नगरसेवक, पदाधिकारी आपल्या माणसांच्या टोळ्या बनवून आपली राजकीय ताकद वाढवू लागला आहे. याकडे कुणी लक्ष दिले का? तर नाही, तूही मोठा हो आणि आम्हीही… ही वृत्तीच अंगी भिनली आहे. अनधिकृत झोपडय़ांचे इमले चढताहेत. त्यांच्या वाढत्या गरजा, पाणी, वीज, गटारे, शौचालये यांचा ताण आता मुंबईला सहन होत नाही. बेकायदा उद्योगधंद्याला ऊत आलाय. मुंबईच्या खाडिकिनाऱयाला संरक्षण करणाऱया तिवरांची कत्तल केली जात आहे. या सर्वांचा परिणाम हा 26 जुलै आणि 29 ऑगस्टच्या घटनांसारखा होत आहे आणि होतच राहणार. सत्ताधारी आणि मुंबई महापालिका नेहमीच मुंबईच्या भौगोलिक रचनेवर खापर फोडत असते. आपण केलेल्या कामांचा उदो उदोही करते. मग अशी पाळी का येते, याचे उत्तर मात्र गोल गोल देऊन मुंबईकरांची दिशाभूल करण्यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. तब्बल 1200 कोटींचे पंपिंग स्टेशन्स, प्रत्येक वर्षी ड्रेनेज सिस्टिमसाठी जवळपास 2 हजार कोटींचा, 400 कोटी नालेसफाईवर खर्च केले जातात, पण मुंबई काय सुधारत नाही. मुंबईकर हे सर्व मुकाटय़ाने सहन करतो.

राजकीय पुढारी, नेते, नगरसेवकांचा राबता कुठे असतो याचाही साकल्याने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक नगरसेवक, नेत्याने आपला प्रभाग, वॉर्डातील समस्या, रस्ते, गटारे, नाले, वीज, पाणी, झोपडय़ा यांच्यावर जातीने लक्ष घातले तर पर्यायाने अख्खी मुंबई सुनियोजित होईल. टक्केवारीच्या गाळात रुतण्यापेक्षा सामान्य नागरिकांचे जीवन कसे सुखकर होईल, याकडे लक्ष दिले तर ते दुवा देतील. पण ज्यांना आपली खुर्ची शाबूत ठेवायची आणि फक्त विकासकामाच्या नावाखाली नागरिकांना झुलवत ठेवण्याचा धंदाच करायचा आहे त्यांना याची फिकीर पडलेली नसते.

&ंशेवटी महापालिका, सत्ताधाऱयांनी कितीही स्वत:चे कौतुक केले तरी त्यांचे अपयश लपून राहिलेले नाही. छातीपर्यंत आलेले पाणी जेव्हा नाकातोंडात जायला लागते तेव्हा काय अवस्था होते, हे यांना कोण समजावून सांगणार. असो, मुंबईकरांनी मंगळवारच्या पावसात आपले धैर्य, स्पिरिट दाखवले त्याला तोड नाही. त्यांनी दाखवलेली सजगता, तत्परता, माणुसकीचा पूर याला खरंच सलाम !

-दीपक चौगले

Related posts: