|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » उद्योग » एलआयसीकडून वर्षभरात दोन कोटींवर पॉलिसी

एलआयसीकडून वर्षभरात दोन कोटींवर पॉलिसी 

प्रतिनिधी/पुणे

गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बाजारातील हिश्श्यात विमा पॉलिसीच्या निकषावर लक्षणीय वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एलआयसीने दोन कोटी एक लाखापेक्षा अधिक पॉलिसी पूर्ण केल्या असून, जवळपास सव्वा लाख कोटी (1,24,396.27) रुपये प्रथम हप्ता उत्पन्न प्राप्त केल्याची माहिती पुणे विभाग एकचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक प्रशांत नायक शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

एलआयसीचा 62 व्या वर्धापन दिनानिमित 1 ते 7 सप्टेंबर कालावधीत ‘एलआयसी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. पॉलिसी संख्येवर आधारित एलआयसीचा बाजारातील हिस्सा 76.09 टक्के, तर प्रथम हप्ता उत्पन्नावरील हिस्सा 71.07 टक्के आहे. सद्यस्थितीतील पॉलिसींची संख्या 29.04 कोटी इतकी आहे. 31 मार्च 2017 अखेर एलआयसीचे एकूण उत्पन्न 4,92,626.60 कोटी असून, एकूण मालमत्ता 25,72,028 कोटी इतकी आहे. एलआयसीची गंगाजळी 23,23,802.59 कोटी आहे. एलआयसीने 215.58 लाख दाव्यांचे निराकरण केले असून, दाव्यांपोटी 1,12,700.41 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. त्यामध्ये मुदतपूर्व दाव्यांचे प्रमाण 98.34 टक्के, तर मृत्यू दाव्यांचे प्रमाण 99.63 टक्के आहे, असे नायक म्हणाले.

एलआयसीने लोककल्याणासाठी अनेक योजनांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. गृहनिर्माण 65,693 कोटी, उर्जा 1,17,398 कोटी, रस्ते व पूल आणि रेल्वे 35,210 कोटी क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. शाळांमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यासाठी 1.48 कोटीचे दिले आहे.

 एलआयसीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे विभाग एकमधील सर्व 17 शाखांनी विविध शाळांना शालेय साहित्यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत केली. तसेच शेवगाव शाखेअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील महोज येथे पाण्याच्या टाकीसाठी 50 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात आले. 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान सप्ताहाचे आयोजन केले असून, या काळात आरोग्य तपासणी शिबिर, 1000 पेक्षा अधिक वृक्षलागवड, गरजू विद्यार्थ्यांना मदत, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, शिक्षकांचा सत्कार असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

10 वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट…

पुणे विभाग एकने 10 वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले. यासह इतर सहा निकषांवरही उद्दिष्टपूर्ती झाली आहे. 2016-17 या वर्षात 1,75,548 पॉलिसीमार्फत 38,808.53 लाख रुपयांचे एकूण हप्ता उत्पन्न झाले. यामध्ये चिंचवड शाखेने 21,273, निगडी 18,969 तर पिंपरी शाखेने 13,912 पॉलिसी केल्या. देय विद्यमानता व मृत्यू दाव्यांचे निराकरण करताना 5,242 मृत्यू दाव्यांपोटी 86.58 कोटी रुपये वारसांना, तर मुदतपूर्ती दाव्यांपोटी 767.97 कोटी रुपये देण्यात आले.

Related posts: