|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भाजप सरकारच्या विरोधात चिकोडीत बसपतर्फे रॅली

भाजप सरकारच्या विरोधात चिकोडीत बसपतर्फे रॅली 

भाजप सरकारच्या विरोधात चिकोडीत बसपतर्फे रॅली

प्रतिनिधी/ चिकोडी

दलित, मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्याक महिलांवरील अत्याचार, खून प्रकरणे रोखण्यात अपयशी ठरलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारच्या निषेधार्थ चिकोडी तालुका बहुजन समाज पार्टीतर्फे भव्य रॅली काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी बसपाचे राज्य प्रधान सचिव राजीव कांबळे भाजपावर टिका करताना म्हणाले, भाजपने अधिकाराचा दुरुपयोग करत आरएसएसचे धोरण राबविल्याने हजारोजणांना जीव गमवावा लागत आहे. सर्वसामान्य लोकांना लुटणाऱया कार्पोरेटर व व्यापाऱयांचा व्यापार वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी जगातील वेगवेगळय़ा देशांचा प्रवास करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची महागाई, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदींचे खासगीकरण व नोटाबंदीसारख्या लोकविरोधी धोरणांबद्दल जागृती करणे गरजेचे आहे.

केंद्रात व बहुतांशी राज्यात भाजपला सत्ता मिळाल्यानंतर दलित, मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक महिलांवरील अन्याय प्रकरणात वाढ झाली आहे. या प्रकरणाविषयी चर्चेस संधी न दिल्याने बीएसपी अध्यक्षा मायावतींनी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात भाजपच्या लोकविरोधी नितीबद्दल कर्नाटकातील चार विभागात आंदोलन हाती घेण्यात येणार असून कार्यकर्ते व दलित, अल्पसंख्याक बांधवांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे सांगितले.

या रॅलीस चिकोडी बसस्थानकापासून प्रारंभ करण्यात आला. इंदिरानगर क्रॉस, बसवसर्कल मार्गे ही रॅली मिनी विधानसौधकडे आली. यावेळी दुचाकी रॅलीही काढण्यात आली होती. या रॅलीत मच्छिंद्र काडापुरे, सुधाकर मदरखंडी, रायाप्पा देसाई, रमेश कांबळे, मधुकर देवरुषी, राजेंद्र मोशी, शौकतअली नदाफ, प्रकाश कोरे, शशिकांत कांबळे, अनिल चंदूरकर, संजय तळवार, केंपन्ना इटेकर यांच्यासह बसपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.