|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » शरापोव्हा, व्हीनस उपउपांत्यपूर्व फेरीत

शरापोव्हा, व्हीनस उपउपांत्यपूर्व फेरीत 

अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम चॅम्पियनशिप : विम्बल्डन चॅम्पियन मुगुरुझाचीही आगेकूच, पुरुष एकेरीत सिलिक, जॉन इस्नेरचे आव्हान मात्र

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

रशियाची गोल्डनगर्ल मारिया शरापोव्हा, अमेरिकेची व्हीनस विल्यम्स, विम्बल्डन चॅम्पियन गॅर्बिने मुगुरुझा यांनी अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील शेवटच्या 16 मध्ये धडक मारली. पुरुष एकेरीत सिलिक व जॉन इस्नेरचे आव्हान मात्र संपुष्टात आले. कॅनडाचा डेनिस शापोव्हालोव्ह 1989 नंतर या स्पर्धेतील शेवटच्या 16 मध्ये दाखल होणारा सर्वात तरुण खेळाडू देखील ठरला.

दिवसभरातील पहिल्या टप्प्यात, महिला एकेरीत मारिया शरापोव्हाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना लॅटव्हियाच्या ऍनास्नासिजा सेवास्तोव्हाचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर 15 महिन्यांची बंदी पूर्ण करणारी माजी अव्वलमानांकित शरापोव्हा सध्या विशेष बहरात असून चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चित केल्यानंतर तिने कुझनेत्सोव्हावर ट्वीटरच्या माध्यमातून लक्षवेधी टिपणी केली. ‘मी चौथ्या फेरीत पोहोचले. कुझनेत्सोव्हा कुठे आहे?’ असा सवाल तिथे तिने विचारला.

एप्रिलमध्ये बंदी पूर्ण करणाऱया शरापोव्हाला यापूर्वी प्रेंच ग्रँडस्लॅमचे वाईल्ड कार्ड दिले गेले नव्हते तर विम्बल्डन स्पर्धेदरम्यान ती दुखापतीने ग्रस्त होती. मात्र, नंतर हार्डकोर्टवर केवळ एकच लढत खेळली असली तरी या अमेरिकन ग्रँडस्लॅमसाठी आयोजकांनी तिला वाईल्ड कार्ड बहाल केले. त्यानंतर तिसऱया फेरीतील लढतीत तिने फोरहँड फटक्यावर आपला विजय निश्चित केला. महिला एकेरीतील अन्य लढतीत व्हीनस विल्यम्सने ग्रीसच्या 95 व्या मानांकित मारिया सकॅरीचा 6-3, 6-4 तर विम्बल्डन चॅम्पियन गॅर्बिने मुगुरुझाने स्लोव्हाकियाच्या 31 व्या मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाचा 6-1, 6-1 अशा फरकाने अवघ्या 62 मिनिटातच फडशा पाडला.

महिला एकेरीतील या गटात आता मुगुरुझाला रोखण्याची क्षमता केवळ विद्यमान अव्वलमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा व चौथी मानांकित इलिना स्वितोलिना यांच्यातच आहे. ‘मी येथील प्रत्येक लढत फायनल असल्याप्रमाणे खेळत आली आहे’, अशी प्रतिक्रिया मुगुरुझाने दिली. तिची पुढील लढत झेकची 13 वी मानांकित पेत्रा क्विटोव्हाविरुद्ध होईल. क्विटोव्हा 2011 व 2014 ची विम्बल्डन चॅम्पियन असून तिने यापूर्वी तिसऱया फेरीत फ्रान्सच्या 18 व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाचा 6-0, 6-4 असा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला.

पुरुष एकेरीत क्रोएशियाच्या पाचव्या मानांकित सिलिकला मात्र अर्जेन्टिनाच्या 29 व्या मानांकित दिएगो स्विर्त्झमनविरुद्ध 4-6, 7-5, 7-5, 6-4 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. कॅनडाचा टिनेजर टेनिसपटू डेनिस शापोव्हालोव्ह 1989 नंतर अमेरिकन ग्रँडस्लॅमच्या शेवटच्या 16 मध्ये पोहोचणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. इस्त्रायलचा जन्म असलेल्या, पण, कॅनडाचे प्रतिनिधीत्व करणारा हा युवा खेळाडू अवघ्या 18 वर्षांचा आहे. ब्रिटनच्या काईल एडमंडला मानेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर शापोव्हालोव्हचे अंतिम 16 मधील स्थान निश्चित झाले. काईलविरुद्ध डेनिस 3-6, 6-3, 6-3, 1-0 अशा फरकाने आघाडीवर होता.

आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी डेनिससमोर स्पेनच्या 12 व्या मानांकित पॅबलो कॅरेनो बुस्टाचे आव्हान असेल. पॅबलोने तिसऱया फेरीत प्रेंच क्वॉलिफायर निकोलस महूतला 6-3, 6-4, 6-3 असे नमवले. अमेरिकेचा दहावा मानांकित जॉन इस्नेर जर्मनीच्या 23 व्या मानांकित मिस्चा झ्वेरेव्हकडून 6-4, 6-3, 7-6 (7/5) अशा फरकाने पराभूत झाला. इटलीचा 35 वर्षीय पॅब्लो लोरेन्झी राष्ट्रीय सहकारी थॉमस फॅबियानोला नमवल्यानंतर या स्पर्धेच्या अंतिम 16 मध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला. लोरेन्झीची पुढील लढत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकला 6-4, 6-3, 6-2 असे नमवणाऱया दक्षिण आफ्रिकन केव्हिन अँडरसनविरुद्ध होईल.

पेस-पूरव राजा दुसऱया फेरीत, सानिया, बोपण्णा पराभूत

अनुभवी लियांडर पेस व पूरव राजा या जोडीने पुरुष एकेरीच्या दुसऱया फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. या जोडीने सर्बियाच्या जांको टिप्सेरेव्हिक व व्हिक्टर ट्रोईकी यांचा 6-1, 6-3 असा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. याचवेळी सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा मात्र आपापल्या गटात दुसऱया फेरीत पराभूत झाले. बोपण्णा-पॅबलो यांना माजी ऑस्ट्रेलियन ओपन जेते फॅबिओ फॉग्निनी-सिमोन बोलेली यांच्याविरुद्ध पहिला सेट जिंकल्यानंतर देखील 5-7, 6-4, 6-4 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. 1 तास 47 मिनिटातच ही लढत निकाली झाली. सानिया व इव्हान दोडिग यांना मिश्र दुहेरीत ओस्टापेंको-फॅब्राईस मार्टिन या लॅटव्हियन-प्रेंच जोडीकडून 7-5, 3-6, 6-10 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

 

संपुष्टात

Related posts: