|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » परतीच्या प्रवासासाठी खासगीसह सर्व गाडय़ांना खच्चून गर्दी!

परतीच्या प्रवासासाठी खासगीसह सर्व गाडय़ांना खच्चून गर्दी! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

sगणपती-गौरी विसर्जनानंतर चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाकडे मोर्चा वळवला असून कोकण रेल्वे, एस. टी. महामंडळाच्या बसेसह सर्व खासगी ट्रव्हल्स वगैरे भरगच्च झाल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी विभागीय एस. टी. महामंडळाने अतिशय उत्तम नियोजन केले असून कोणत्याही प्रवासांची गैरसोय होवू नये, यासाठी प्रवासी मित्रही नेमले आहेत. मात्र कोकण रेल्वेने शेकडो जादा गाडय़ा सोडूनही नियोजनशून्य कारभार पहावयास मिळाला. ज्यांनी महिनाभर आधी परतीचे रिझर्व्हेशन केले, त्यांना जागाच मिळाली नाही. त्यामुळे हा नाराज झालेला चाकरमानी वर्ग एस.टी आणि खासगी गाडय़ांकडे वळला आहे. महामार्गावर गर्दी वाढली असून वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी महामार्ग पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.

ज्या उत्साहाने चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल झाले होते, त्याच उत्साहाने परतीला लागले आहेत. मात्र एस.टी. आणि खासगी ट्रव्हल्स सोडल्यास कोकण रेल्वेने चाकरमान्यांना जाताच येत नाही आहे. सिंधुदुर्ग मार्गावरून सर्व ट्रेन हाऊसफुल्ल होवून येत असल्याने रत्नागिरी व त्यापुढील स्टेशनवर रेल्वे डब्यातील आतील प्रवासी दरवाजा उघडत नाहीत. त्यामुळे रिझर्व्हेशनही केलेल्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यातच गाडय़ा तासन्तास कोलमडत आहेत. परिणामी काही गाडय़ा रद्द करण्याचीही वेळ रेल्वे प्रशासनावर आली आहे. अनेकांनी या रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱयांना धारेवर धरले, खरे मात्र या ढीसाळ नियोजनाविषयी कोणी बोलतच नाही.

दुसरीकडे तोटय़ात चाललेल्या एस.टी.ने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून प्रवाशांच्या मागण्यांनुसार एस.टी.बसेस मुंबई मार्गावर सोडल्या जात आहेत. त्यासाठी इतर जिल्हय़ातील जादा गाडय़ा रत्नागिरी डेपोत मागवण्यात आल्या आहेत. तसेच येथील खासगी ट्रव्हल्सधारकांचाही गर्दीचा हंगाम सुरू आहे. सगळय़ा ट्रव्हल्स बुकींगप्रमाणे सोडल्या जात आहेत. जवळपास रत्नागिरीतून 50 एक खासगी गाडय़ा रात्रीच्या वेळेत चाकरमान्यांसह सुटत आहेत.

शेकडो चाकरमान्यांनी स्वत:च्या खासगी गाडीने परतीची वाट धरली आहे. त्यामुळे महामार्गावर गाडय़ाच गाडय़ा दिसत आहेत. वाहतूक कोंडीही होत आहे, मात्र एकाचवेळी इतक्या शेकडो गाडय़ा सुटत असल्याने तसेच इतर वाहने यामुळेही कोंडी होतेच. तरीही जिल्हा वाहतूक पोलीस व महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक कोंडी फार वेळ राहू नये, यासाठी योग्य नियोजन केले आहे.

रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

कोकण रेल्वे नियोजनशून्य कारभाराचा फटका रेल्वे पोलिसांना चांगलाच बसला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 100 हून अधिक जवान या ठिकाणी कार्यरत असून गर्दीमुळे रेल्वेचा दरवाजा उघडला जात नसल्याने रेल्वे पोलिसांची दमछाक उडत आहे. तरीदेखील कोणत्याही प्रवासाला नाहक त्रास होता कामा नये, यासाठी हे जवान अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त बजावत आहेत. या रेल्वे पोलिसांमुळेच बहुतांश प्रवाशांना रेल्वेत चढायला मिळाले, अन्यथा आतील प्रवासी इतर प्रवाशांना चढूदेखील देत नव्हते. रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकही करण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य विभागाविषयी नाराजी

महामार्गावर जिल्हा पोलीस दलामार्फत मदतकेंद्र उभारण्यात आले असून या मदतकेंद्राच्या ठिकाणी 3 दिवसांपूर्वी एकही ऍब्युलन्स नव्हती. जिल्हा आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. हा गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रत्येक पेन्डॉलवर ऍब्युलन्स आवश्यक होती, मात्र जिल्हा आरोग्य विभागाला याविषयी सांगूनही कोणतेही नियोजन नव्हते. वाहतूक पोलीस अधिकाऱयांनी याविषयी नाराजी व्यक्त केली.

Related posts: