|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आखाडा येथील गणेश देखाव्याचे उद्घाटन

आखाडा येथील गणेश देखाव्याचे उद्घाटन 

वार्ताहर/ कुंभारजुवे

आखाडा येथील युवा कलाकारांनी कलेच्या माध्यमातून या गावाला एक नवी ओळख दिली आहे. कुठलेही काम एकजुटीने केले तर त्याचा परिणाम किती चांगला असू शकतो, त्याचेच हे एक उदाहरण आहे. आपल्या मतदारसंघातील आखाडा, सांतईस्तेव्ह-टोंकवाडा कुंभारजुवे येथे गणेश देखाव्यामुळे हजारो लोक येऊन श्रींचे दर्शन घेतात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री तथा स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर यांनी केले.

आखाडा येथील श्री ब्रह्मेश्वर युवक संघाच्या ‘आखाडय़ावरचा विधाता’ या गणेश देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वीजमंत्री पांडुरंग मडकईकर श्री पांडुरंग देवस्थानच्या रंगमंचावरुन बोलत होते. याप्रसंगी या गणेश देखाव्याचे मार्गदर्शक प्रसिद्ध चित्रकार प्रदीप परब, आखाडय़ाचे पंचसदस्य सुरेंद्र वळवईकर, श्री ब्रह्मेश्वर युवक संघाचे अध्यक्ष रोहिदास चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पंचसदस्य सुरेंद्र वळवईकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. यंदा गणेश देखाव्याचे तेरावे वर्ष आहे. येथील युवा कलाकारांनी गणेश देखाव्याच्या माध्यमातून या गावाचे नाव सर्वदूर केले आहे. या गणेश देखाव्याला तुम्हा सर्वांचे सहकार्य लाभल्याने नवीन उत्साह येतो. याकामी प्रसिद्ध चित्रकार प्रदीप परब यांचे योगदान मोठे आहे, असे उद्गार रोहिदास चोडणकर यांनी स्वागतपर काढले.

या गणेश देखाव्याचे समई प्रज्वलन करून व बटन दाबून वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी उद्घाटन केले. सूत्रसंचालन व आभारप्रकटन रोहिदास चोडणकर यांनी केले.